Wed, Mar 20, 2019 09:17होमपेज › Sangli › मुंबईत 2 एप्रिलला सेबी कार्यालयावर मोर्चा

मुंबईत 2 एप्रिलला सेबी कार्यालयावर मोर्चा

Published On: Feb 07 2018 1:36AM | Last Updated: Feb 06 2018 10:09PMसांगली : प्रतिनिधी

पर्ल्समध्ये महाराष्ट्रातील सुमारे 1 कोटी गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे. पर्ल्सची मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. सेबी आणि पर्ल्सचे मालक दोघेही संगनमताने गुंतवणूकदारांची फसवणूक करीत आहेत. याविरोधात अखिल भारतीय पर्ल्स गुंतवणूकदारांच्या संघटनेतर्फे 2 एप्रिलरोजी मुंबईत सेबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बँक कर्मचारी व कामगार संघटनेचे नेते कॉ. विश्‍वास उटगी यांनी दिली. संघटनेच्यावतीने येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ. शंकर पुजारी होते. 
कॉ. उटगी म्हणाले, पर्ल्स कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू झालेली आहे.

सुरुवातीला 2500 पर्यंतची गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यात येत आहेत. पर्ल्स कंपनीची मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश सेबीला देण्यात आले आहेत. परंतु सेबी व पर्ल्स कंपनीचे मालक यांनी संगनमताने मालमत्तेची विक्री करीत आहेत. ही मालमत्ता कमी दरात विकली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची पुन्हा एकदा फसवणूक होत आहे. पैसे परत मिळण्यासाठी सेबीने ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. परंतु पर्ल्सचा गुंतवणूकदार हा ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरीवर्गातील आहे. त्यामुळे त्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येत नाही.

या गुंतवणूकदारांनी लेखी कर्ज सेबीकडे केलेले आहेत. तेच ग्राह्य मानून पैसे परत करावेत. सेबीचा व्यवहार पारदर्शक नाही. पर्ल्सने कंपनीतील पैसे अन्य 640 सेल कंपन्यांमध्ये गुंतवलेल्या आहेत. पर्ल्सची मालमत्तेची विक्री करीत असताना गुंतवणूकदारांचा प्रतिनिधी त्यामध्ये घ्यावा, आदी मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने  सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. याचा पहिला टप्पा म्हणून 2 एप्रिलला मुंबईतील सेबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कॉ. शंकर पुजारी म्हणाले, सेबीचे अधिकारी व पर्ल्सचे मालक यांच्या संगनमताने ताब्यात घेतलेली मालमत्ता विकली जात आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संघटनेतर्फे सुरू करण्यात असल्याचे ते म्हणाले. किसान सभेचे कॉ. राजन क्षीरसागर, फेरीवाले संघटनेचे कॉ. शाम चिंचणे यांनी मार्गदर्शन केले. विजय बचाटे यांनी आभार  मानले.