होमपेज › Sangli › नारायण राणे यांची आज सांगलीत ‘चाचपणी’

नारायण राणे यांची आज सांगलीत ‘चाचपणी’

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 11:21PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बांधणीसाठी शुक्रवारी मध्यरात्री सांगलीत दाखल झाले. त्यांना  काँग्रेस व  राष्ट्रवादीतील नाराज असलेल्या ‘मिरज पॅटर्न’च्या आठसह 12 नगरसेवक आणि रयत आघाडीतील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य शनिवारी भेटणार आहेत. आणखी काही आजी-माजी नगरसेवकही त्यांच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वच पक्षात खळबळ उडाली असून, बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यात राणे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, काँग्रेसचे युवानेते नजीर वलांडकर यांचा गट मोठा आहे. त्यांच्या माध्यमातून सांगलीतही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बांधणीची मुहूर्तमेढ रोवण्याचा संकल्प राणे यांनी केला आहे. त्यासंदर्भात सांगली दौर्‍याला विशेष महत्त्व आहे. 

सहा महिन्यांवर महापालिका निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने काँगे्रस, राष्ट्रवादीसह स्वाभिमानीतीलही काही सदस्य नाराज आहेत. यामध्ये काँग्रेसमधील मिरज पॅटर्न मानणारा गट तर काँग्रेसवर सपशेल नाराज आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशीही आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आहे. पण राष्ट्रवादीतही गटबाजी जोरात आहे. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीतील मिरज पॅटर्नचे आठ आणि सांगलीतील चार असे सुमारे 12 नगरसेवक आज राणे यांना भेटणार असल्याची चर्चा आहे. 

यासह जिल्हा परिषदेत रयत आघाडीचेही काही जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य भाजपवर नाराज आहेत. या सर्वांचाच ‘मेळ’ सम्राट महाडिक, नजीर वलांडकर यांच्या माध्यमातून साधला जाण्याची शक्यता आहे. स्वाभीमानी’तील काहीजणांची महाडिक यांच्याशी मैत्री आहे. त्यामुळे या माध्यमातून महाराष्ट्रभर या ‘स्वाभिमान’ची व्याप्ती वाढू शकते. महापालिका निवडणुकीतही वेगळा पर्याय दिला जाऊ शकतो. त्यादृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. यासंदर्भात सकाळी 11 वाजता माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन श्री. राणे चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीला कोण-कोण जाते याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.