Thu, Jun 27, 2019 16:26होमपेज › Sangli › चर्चा आघाडीची; चाल स्वबळाची

चर्चा आघाडीची; चाल स्वबळाची

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 8:13PMसांगली : उध्दव पाटील

महापालिका निवडणुकीत भाजपचा उधळता वारू रोखण्यासाठी आघाडीची गरज दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र अजूनतरी वाटाघाटीच्या बैठकीला मुहूर्त लागलेला नाही. राष्ट्रवादीने मात्र ‘जनसंवाद’ साधण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक प्रभागात बैठकांचा सपाटा सुरू आहे. या बैठकांमधील भाषणांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सत्ताधारी काँग्रेसच्या अपयशाचे पाढे वाचतानाच भाजपवरही टीका करत आहेत. यातून ‘चर्चा आघाडीची आणि चाल मात्र स्वबळाची’ असे चित्र  उमटत आहे. अर्थात काहीही झाले तरी जयंतरावांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.  

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्येही भाजपने यश मिळविल्यानंतर आता सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीत ‘चमत्कार’ घडविण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. भाजपच्या ‘भेटवस्तू’ने निवडणुकीत उत्सुकता आली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक आजी-माजी नगरसेवकांभोवती गळ टाकून भाजपने  ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आहे. भाजपचा निवडणूक फंडा जोरात चर्चेत असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी सावध झाली. दोन्ही काँगे्रसमधील नेते आघाडीची भाषा बोलू लागले. मात्र प्रत्यक्ष आघाडीच्यादृष्टीने सध्यातरी पावले उचलली जात नसल्याचे दिसत आहे. आघाडीपूर्वीच बिघाडीचे काहींचे प्रयत्नही अधूनमधून डोकावताना दिसत आहेत. 

जयंतरावांची आघाडी

जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. ‘होमपिच’वरची ही निवडणूक जयंतरावांसाठी मोठ्या प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत जयंतरावांना ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे चित्र अजून स्पष्ट व्हायचे आहे. मात्र त्याची प्रतीक्षा करत न बसता जयंत पाटील यांनी ‘पेरणी’स सुरुवात केली आहे. ‘एकला चलो रे’चे तंत्र अवलंबत निवडणूकपूर्व ‘जनसंवादा’तून त्यांनी आघाडी घेतली आहे. 

काँग्रेसवर ‘हल्लाबोल’

जनसंवाद बैठकांच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी प्रभागनिहाय बैठकांचा धडाका सुरू केला आहे.  प्रभागातील समस्या, गार्‍हाणी ऐकून घेणे आणि महाआघाडीची कारकिर्द व सत्ताधारी काँग्रेसची कारकिर्द जनतेसमोर ठेवत दोन्ही काँग्रेसमध्ये उजवे कोण, डावे कोण हे जनतेवर बिंबवण्याचे त्यांचे काम सुरू आहे. एकीकडे काँग्रेसबरोबर आघाडीची चर्चा भाषणांमधून होत असताना काँग्रेसवर शरसंधान साधण्याचा मोकाही  ते सोडत  नाहीत. महापालिकेत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली महाआघाडीच्या कालावधीत पाणी योजना, जलशुद्धीकरण प्रकल्प, भुयारी गटार योजना, काळ्या खणीचे सुशोभिकरण, सांगली-मिरज रस्ता, कृष्णाकाठी पूर संरक्षक भिंत व घाट सुशोभिकरण, उद्याने विकास व अन्य योजना, उपक्रमांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून 550 ते 600 कोटींचा निधी खेचून आणला. पण निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेसला पाणी योजना, भुयारी गटार यासारख्या अतिशय महत्वाच्या योजना गेल्या पाच वर्षात पूर्ण करता आल्या नाहीत. सत्ताधारी काँग्रेस  अपयशी ठरली आहे, असा ‘हल्लाबोल’ ते ‘जनसंवाद’ बैठकांमध्ये करत आहेत.

मदनभाऊ गट नाराज

जयंतरावांचे समविचारी कोण? असा संशय उपस्थित करून काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी खळबळ उडवून दिली असतानाच राष्ट्रवादीबरोबर संभाव्य आघाडीला खोडा घातला आहे. पण मदनभाऊ गट आणि डॉ. पतंगराव कदम गट मात्र राष्ट्रवादीशी आघाडी करण्याच्या मनस्थितीत आहेत. मात्र जयंत पाटील हे  सत्ताधारी काँग्रेसवरच अपयशाचा शिक्का मारू लागल्याने मदनभाऊ गटातून नाराजीचा सूर उमटत आहे. संभाव्य आघाडीतील एका सहकार्‍याकडून असा ‘हल्लाबोल’ त्यांना अपेक्षित नव्हता आणि नाही. त्यामुळे आघाडीची चर्चा सुरू व्हायला पोषक वातावरण तयार होताना दिसत नाही. 

‘जेजेपी’चा शिक्का पुसण्याची संधी

सांगलीतील भाजप म्हणजे ‘जेजेपी’ असल्याचा आरोप जयंतरावांवर नेहमीच होत आला आहे. सांगली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ऐनवेळी ‘घड्याळ’ काढून ठेवत ‘कमळ’ हातात घेत काँग्रेसच्या पराभवाला ‘हात’भार लावला. तेव्हापासून तर ‘जेजेपी’ हा शिक्का अधिक गडद झाला. मात्र आता संदर्भ बदलले आहेत. उरूण - इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपने जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला  धक्का देत यश मिळवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर इस्लामपूर येथे अल्प कालावधीत अनेकदा मेळावे घेत जयंतरावांविरोधात रान उठविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. अशा परिस्थितीत सांगली महापालिका निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. ‘जेजेपी’चा शिक्का पुसत काँग्रेसबरोबर ‘दिल - से’ आघाडी करत भाजपला रोखण्याची संधी त्यांच्यासमोर आहे. जनसंवाद बैठकांमधून त्यांनी भाजपवरदेखील टीकास्त्र सोडत आपला पवित्रा स्पष्ट केला आहे. 

धुसफूस शमविली; आऊटगोईंग रोखले

सांगली शहर राष्ट्रवादीत उभी फूट पडली होती. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील समर्थकांत गटबाजी उफाळली होती. राष्ट्रवादीचे काही नगरसेवक, कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात होती. मात्र जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पक्षातील  आऊटगोईंग रोखण्यात त्यांना   यश आले आहे. बजाज-पाटील वादावरही त्यांनी समेट घडवून आणल्याचे दिसत आहे. निवडणुकीपूर्वी पक्षातील ‘बेकी’ संपवून ‘एकी’ साधण्याचा जयंत पाटील यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे  चित्र आहे.