Thu, Apr 18, 2019 16:20होमपेज › Sangli › मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट 

मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट 

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 30 2018 12:27AMसांगली : प्रतिनिधी

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणूक पारदर्शी व्हावी. यासाठी ईव्हीएम मशिनसोबत मतदानाची स्लिप देणारे व्हीव्हीपॅट मशिनही (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल)  वापरण्यात यावे, असा ठराव सर्वानुमते महासभेत करण्यात आला. शासनासोबतच हा ठराव राज्य निवडणूक आयोगालाही पाठवून त्यासंदर्भात पाठपुरावा करू, असे पीठासीन अधिकारी महापौर हारुण शिकलगार यांनी सांगितले.
गटनेते किशोर जामदार यांनी यासंदर्भात ऐनवेळच्या विषयात प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, जुलै महिन्यात महापालिका निवडणूक होणार आहे. निवडणूक पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी ईव्हीएम मशिनसोबतच व्हीव्हीपॅट  यंत्रणा जोडण्यात यावी. आतापर्यंत ईव्हीएम मशिनचा बिघाड व त्या मॅनेज करून निवडणुकीवर परिणाम करणारे अनेक प्रकार समोर आले आहेत.

ते म्हणाले, वास्तविक गेल्या 2009 पासूनच ईव्हीएम मशिनबाबत संशयास्पद वातावरण आहे. यासंदर्भात त्यावेळचे भाजपचे प्रवक्‍ते जी. व्ही. एल. नरसिंहराव आणि भाजपचे विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आवाज उठविला होता. ईव्हीएम मशिन हॅक होऊ शकतात याचे दाखले देऊन त्याला न्यायालयात विरोध केला होता. त्यानंतरही आता कर्नाटकात झालेल्या निवडणुकीतही हुबळी-धारवाड मतदार केंद्रात ईव्हीएम घोटाळा समोर आला होता. पालघरसह अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद पडण्याचे प्रकारही समोर आले आहेत. यामुळे ईव्हीएम मशिनच्या वापराबाबत सर्वपक्षीय साशंकता आहे. त्यासाठी ईव्हीएम मशिनसोबतच व्हीव्हीपॅट मशिन वापरावे. त्यामुळे मतदाराला आपण केलेल्या मतदानाची उमेदवार, चिन्हासह स्लिपही मिळेल. लोकशाहीवरचा विश्‍वास दृढ होईल.यावर युवराज बावडेकर म्हणाले, तसा ठराव करायला हरकत नाही.

पण असे मशिन बिघाड आणि सेटिंगचे प्रकार करणार्‍यांना मनपात बोलवा. जेणेकरून मशिन हॅकचा प्रकारही पाहता येईल. यावर संतोष पाटील यांनी कर्नाटक निवडणूक आयुक्‍तांच्या पत्राचा याबाबतचा कबुलीजबाब दाखविला. ते म्हणाले, ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार होणे शक्य आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या 2 किलोमीटर अंतरात इंटरनेटला बंदी घालावी. जामर बसवावेत, असे सुचविले होते. यामुळे ईव्हीएम मशिनसोबत व्हीव्हीपॅट बसविणे योग्य ठरेल. विष्णु माने यांच्यासह अन्य नगरसेवकांनीही त्याचे समर्थन केले. त्यानुसार मनपा निवडणुकीत ईव्हीएम मशिनसोबत व्हीव्हीपॅट  मशिन बसविण्याचा ठराव करण्यात आला. तो ठराव लवकरच निवडणूक आयोगाला पाठवू, असे महापौर हारुण शिकलगार यांनी स्पष्ट केले.

लोकशाही प्रक्रियेत साशंकता कशासाठी?

गटनेते जामदार म्हणाले, निवडणुकीत ईव्हीएम मशिनबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. कुठलेही बटण दाबा, मत भाजपला असे प्रकार होत आहेत. हा प्रकारच लोकशाही प्रक्रियेबाबत संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शीपणे होण्यासाठी व्हीव्हीपॅट मशिन गरजेचे आहे. त्या आधारे जरी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला किंवा साशंकता व्यक्‍त झाली, तर व्हीव्हीपॅटच्या आधारे बॅलेटद्वारे पारदर्शकता जपली जाणार आहे.