Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Sangli › दिनकरतात्यांना रोखण्याचा डाव उधळून लावा

दिनकरतात्यांना रोखण्याचा डाव उधळून लावा

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:18PMसांगली : प्रतिनिधी

दिनकरतात्यांसारखा नेता राज्याच्या राजकारणात मोठी भरारी घेऊ पाहात आहे. असे असताना त्यांना सांगलीवाडीतच रोखण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीवाले करीत आहेत. त्यांचा हा डाव उधळून लावा, भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. सांगलीवाडीत प्रभाग 13 चे उमेदवार अजिंक्य पाटील, सौ. अपर्णा कदम व गजानन आलदर यांच्या प्रचारार्थ शिवशंभो चौक येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले, सांगली महापालिकेत गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता आहे. परंतु त्यांनी काहीच विकास कामे केलेली नाहीत. सांगलीवाडीतही गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरी सुविधांची दुरवस्था झाली आहे. एकीकडे खेडी शहरापेक्षा सुसज्ज, अत्याधुनिक होत आहेत. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराने सांगलीवाडीला शहरात असूनही कारभार्‍यांनी बकाल अवस्था आणली आहे.

ते म्हणाले, भाकरी तव्यामध्ये तशीच ठेवली तर ती करपून जाते. त्यामुळे ती सतत परतवावी लागते. तशाच पद्धतीने महापालिकेत त्याच त्या काँग्रेस- राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. त्यासाठीच महापालिकेतील सत्ता ही आता परतविण्याची गरज आहे. सत्ता बदल घडवून भाजपला संधी द्या, केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा आपल्या दारी पोहोचेल. त्यासाठी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेच आमदार सुरेश खाडे यांच्या जोडीला दिनकर पाटील हे आघाडीवर असतील.