Wed, Apr 24, 2019 11:51होमपेज › Sangli › इच्छुकांची झुंबड; पक्षांचे वेट अ‍ॅण्ड वॉच

इच्छुकांची झुंबड; पक्षांचे वेट अ‍ॅण्ड वॉच

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 26 2018 8:45PMसांगली : अमृत चौगुले

महापालिका निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे आता इच्छुकांचीही संधीसाठी लगबग सुरू झाली आहे. सर्वच पक्षांतून हजारांवर इच्छुक आहेत. त्यामुळे विस्तृत आकाराच्या प्रभागात जनसंपर्क वाढवण्याबरोबरच नेत्यांकडे इच्छुकांचे हेलपाटे सुरू आहेत. परंतु मोठ्या प्रभागांतून आरक्षणांचे गणित घालून विनिंग मेरिटनुसार चार सदस्य पॅनेल  उभे करण्याचे पक्ष आणि नेत्यांसमोर आव्हान आहे. 

त्यामुळे सर्वांनीच वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. अर्थात मे महिनाअखेर आचारसंहिता लागणार असल्याने मेच्या दुसर्‍या आठवड्यात खर्‍या अर्थाने संधीनुसार संधीसाधूंची पक्षांतर, पक्षप्रवेश सोहळ्यांना गती येईल. त्यानुसार इलेक्शन फिव्हरही वाढणार आहे.

या निवडणुकीत काँगे्रस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, महापालिका संघर्ष समिती, जिल्हा सुधार समिती, आप आदी पक्ष रिंगणात आहेत. अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीची सध्या महापालिकेत ताकद मोठी आहे. त्यामुळे त्या दोन्ही पक्षांत सत्तेसाठी रस्सीखेच होणार आहे. दुसरीकडे  भाजपने राज्य, केंद्र, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायतींची सत्ता काबीज केल्यानंतर महापालिकेवर झेंडा फडकविण्याचा चंग बांधला आहे. शिवसेनेतही विद्यमान नगरसेवक, काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी प्रवेश केल्याने ताकद वाढली आहे. त्यांनीही ताकदीने मनपात प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या प्रत्येक सत्ताकाळात शिरकाव करून अंकुश ठेवणार्‍या इद्रिस नायकवडी यांच्यासह सहकार्‍यांनी महापालिका संघर्ष समितीची तयारी केली आहे. सत्ता आमच्याशिवाय नाही, असा दावा करीत त्यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. पाच वर्षे जनतेतून मनपा कारभाराचा पंचनामा करीत विकासकामांसाठी लढणारी जिल्हा सुधार समितीही आपशी युती करून आता सक्षम पर्याय म्हणून उभी ठाकली आहे. स्वाभिमानी विकास आघाडीच्याही अस्तित्वाची लढाई आहे. 

एकूणच या सर्वांचे सक्षम पर्याय जनतेबरोबरच इच्छुकांसमोर आहेत. अर्थात चार सदस्य प्रभागांत व्होट बँक लक्षात घेऊन माजी, विद्यमान नगरसेवक, पदाधिकार्‍यांसह नव्या दमाचे कार्यकर्तेही निवडणुकीसाठी तयारीत आहेत. अर्थात यामुळे सत्ता काबीज करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापल्यापरीने इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. तशीच कोणत्या पक्षाची उमेदवारी सोयीस्कर होईल. यासाठीही इच्छुक चाचपणी करीत आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये इच्छुकांची अधिक रस्सीखेच सुरू आहे. 

वास्तविक आतापर्यंतच्या निवडणुकीवेळी प्रत्येक इच्छुक आपापल्या पक्षाचे झेंडे, चिन्ह घेऊन जनतेसमोर जात होते. परंतु यावेळी मात्र हे चित्र वेगळेच आहे. अनेक पर्याय असल्याने पक्ष आणि इच्छुकांनीही वेट अँड वॉच अशीच भूमिका ठेवली आहे. अर्थात महापालिकेत सत्ताधारी असल्याने काँगे्रेसने उमेदवारी आणि प्रचाराचा शड्डू ठोकला. अर्ज स्वीकारण्यासही तयारी सुरू केली. त्यानुसार इच्छुकांनीही वेगवेगळे मतप्रवाह नेत्यांसमोर मांडले. यामध्ये तेच ते चेहरे नकोत, निष्ठेचा विचार करून आरक्षणानुसार उमेदवारांची निवड व्हावी, अशाही भावना व्यक्‍त केल्या आहेत.

आता काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सध्या इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. तरीही राज्य, केंद्रातल्या सत्तेचा विचार करता त्यांच्यातील विद्यमान, माजी नगरसेवकांसह ताकदीच्या इच्छुकांसाठी भाजपने फिल्डिंग  लावली आहे. अर्थात मूळचे भाजपचे कार्यकर्ते ताकदीचे नसल्याने भाजपने सत्तेसाठी वाट्टेल ते, या  धोरणानुसार इनकमिंगचाच उमेदवारी फॉर्म्युला राबविण्याचा खुलेआम अजेंडा ठेवला आहे. परंतु आरक्षणानुसार येणार्‍या इच्छुकांचे समाधान करणेही भाजप नेत्यांना वाटते तेवढे सोपे नाही. त्यामुळे त्यांनीही प्रभागनिहाय चाचपणी करीत प्रवेशासाठी इच्छुक असणार्‍यांना योग्यवेळी उमेदवारीचे पाहू, म्हणत  झुलवत ठेवले आहे. 

एकूणच यामुळे प्रत्येक पक्षांत आरक्षणानुसार चारजणांच्या पॅनेलसाठी डझनाहून अधिकजण आता प्रभागात फिरू लागले आहेत. साहजिकच येत्या 15 मेपर्यंत हे चित्र कायम असणार आहे. त्यानुसार जेव्हा पक्षाकडून उमेदवारीबाबत निश्‍चितीचा फॉर्म्युला राबविला जाईल. त्यानंतर पक्षप्रवेश आणि पक्षांतराचा सपाटाच सुरू होणार आहे. 

अर्थात यामध्ये उमेदवारी न मिळाल्यास इच्छुकांतून नाराजीचा फटका पक्षाला बसण्याचा धोका आहे. शिवाय अन्य पक्षांनाही तुल्यबळ उमेदवार मिळणार आहेत. यातून प्रत्येक प्रभागात चुरशीच्या लढती रंगणार आहेत.

विद्यमानांना विरोध; अनेकांवर टांगती तलवार

प्रभागरचनेत अनेकांचे प्रभाग जोडल्याने अनेक विद्यमान सदस्य एकाच प्रभागात एकवटले आहेत. त्यातच आरक्षणानुसार अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून आरक्षित नगरसेवक, इच्छुकांचा शिरकाव आणि रेटा सुरू आहे. यामुळे इच्छुकांतून एकमेकांचे पत्ते कापण्यासाठी नेत्यांकडे तक्रारी करीत दावेदारी सांगितली जात आहे. यामध्ये ओपनला ओपनच संधी द्यावी, अशीही मागणी करीत खुद्द विद्यमान पदाधिकारी दिग्गज नगरसेवकांबद्दलही रोष व्यक्‍त होत आहे. यामुळे  अनेक विद्यमान नगरसेवकांवर  तूर्त तरी टांगती तलवार  आहे.

प्रत्येक पक्षाला गटबाजीचे ग्रहण

सत्तारुढ काँग्रेसमध्ये  अनेक गट आहेत. यातून प्रत्येक नेत्यांनी आपापल्या अस्तित्वासाठी इच्छुकांची जमवाजमव करीत समर्थन सुरू केले आहे. दुसरीकडे उमेदवारीसाठी या गटातून त्या गटात कोलांटउड्या सुरू आहेत. राष्ट्रवादीत  शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज विरुद्ध विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील गट असा संघर्ष आहे.  भाजपने गळ टाकले आहेत. परंतु भाजपकडेही इच्छुकांची गर्दी झाली आहे. शिवाय तिथेही खासदार, आमदारांसह विविध गटांचे समर्थक  आहेत. शिवसेनेतही अनेक गट आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना गटबाजीचे ग्रहण लागले आहे.

Tags : Sangli municipal election issue