Thu, Jun 20, 2019 14:39होमपेज › Sangli › सर्वांनाच क्रॉस वोटिंगचा धसका!

सर्वांनाच क्रॉस वोटिंगचा धसका!

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 8:36PMसांगली : खास प्रतिनिधी 

वर्षामागून वर्षे उलटली...तपामागून तपं लोटली...शुध्द पाण्याच्या मृगजळात गटांगळ्या खात खातच सांगलीकरांची एक आख्खी पिढी काळाच्या पडद्याआड गेली, पण अजूनतरी सांगलीकरांच्या मुखात काही शुध्द पाण्याचे चार थेंब पडलेले नाहीत. याचे कारण म्हणजे शेरीनाल्यात बुचकाळून काढलेलं महापालिकेतील खाऊपासरी राजकारण! त्यामुळे वैतागलेल्या मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत थेट महापालिकेचेच शुध्दीकरण करण्याचा निर्धार केलेला दिसून येत आहे. बहुविध पर्याय उपलब्ध झालेला मतदार या निवडणुकीत तांदळातील खड्याप्रमाणे राजकारणातील अपप्रवृत्तींना  वेचून बाजूला करण्याच्या मनस्थितीत आलेला दिसत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील बहुसंख्य सगळ्या राजकीय पक्षांनी ‘क्रॉस व्होटिंगचा’ धसका घेतल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदारांसमोर आजच्याप्रमाणे वेगवेगळे पर्याय उपलब्ध नव्हते. त्याचप्रमाणे ज्यांच्या खांद्यावर विश्‍वासाने मान टाकावी, असे सक्षम राजकीय पर्यायही मतदारांपुढे उपलब्ध नव्हते. त्यामुळे ‘उडदामाजी काळे गोरे, काय  निवडावे?’ अशी द्विधा मनस्थिती मतदारांची होत असे. त्यामुळे आज याला आणि उद्या त्याला निवडून देण्याशिवाय मतदारांपुढे पर्यायच नसायचा. त्याचा परिणाम असा झाला की कोट्यवधी रुपयांच्या  भ्रष्टाचाराचे आरोप होऊनसुध्दा वर्षानुवर्षे तीच तीच मंडळी सत्तेवर ठाण मांडून बसली होती. मध्यंतरीच्या काळात सांगलीकरांना एक ‘वेगळा’ प्रयोग दाखविण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. पण त्या प्रयोगातही फारसे वेगळे काही नव्हते. या रंगभूमीवरचेे  खलनायक त्या रंगभूमीवर हिरोची भूमिका करताना बघायला मिळाले, एवढाच काय तो बदल. पण ‘वाघ्याचा झाला पाग्या, मूळ स्वभाव जाईना, त्याचा यळकोट राहिना’ असाच प्रत्यय मतदारांना आला. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराची गटारगंगा अव्याहतपणे वाहतच राहिलेली बघायला मिळाली.

महापालिकेच्या स्थापनेपासून काही ठराविक मंडळी महापालिकेत ठाण मांडून बसलेली दिसतात. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या कारनाम्यांनी कोपरापर्यंत नव्हे; तर पार खांद्यापर्यंत हात बरबटल्याचा आरोप असलेली ही मंडळी परंपरागत पध्दतीने महापालिकेची कारभारी का बनत गेली तर मतदारांपुढे सक्षम राजकीय पर्यायच उपलब्ध नव्हता. त्यामुळे महापालिका म्हणजे जणू काही आपणाला दिलेले आंदणच आहे, असे समजून या लोकांनी मिळेल त्यात हात मारण्याचा जणू काही सपाटाच लावलेला होता. त्यापैकी शेरीनाला शुध्दीकरण योजना, भुयारी गटार योजना, सुधारित पाणी पुरवठा योजना, अमृत योजना, गुंठेवारी नियमितीकरण योजना, वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजना अशी काही नामांकीत उदाहरणे मतदारांच्या समोर आहेत. ठेकेदार आणि नगरसेवकांच्या भ्रष्ट नगरसेवकांच्या साखळीबद्दल तर पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत गवगवा झालेला आहे. रोजच्या रोज महापालिकेतील वेगवेगळ्या भानगडींबद्दल रकानेच्या रकाने भरून येत होते. पण कारभारात मात्र काही सुधारणा होत नव्हती. याचे कारण म्हणजे सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे बिचारा मतदार अगतिक होता.

मात्र महापालिकेच्या इतिहासात यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदारांना बहुविध पर्याय उपलब्ध झाल्याचे दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, एमआयएम, शहर सुधार समिती आणि अपक्ष असे अनेक पर्याय मतदारांना उपलब्ध झाल्याचे दिसत आहे. गंमत म्हणजे बहुसंख्य ‘जुनी-जाणती’ आणि ‘नामांकित’ कारभारी मंडळी या सगळ्या पक्षात आणि आघाड्यांमध्ये विखरून विखरून  पुन्हा सामील झालेली दिसतायत. पण या ‘सराईत’ लोकांप्रमाणेच काही नवीन आणि आश्‍वस्त चेहर्‍याचे उमेदवारसुध्दा सगळ्याच पक्ष आणि आघाड्यांकडे बघायला मिळतात. त्यामुळे पूर्वीच्या भानगडबाजांना ओवाळून टाकून नव्या दमाच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराची निवड करण्याची संधी मतदारांना उपलब्ध झालेली दिसत आहे. 

त्यामुळे मतदारांच्या मनाचा कानोसा घेता असे दिसून येते की लोकांची आता मानसिकता बदललेली आहे. कोणत्याही ठराविक पक्षाला अथवा ठराविक उमेदवाराला साथ देण्यापेक्षा समोर जे जे चांगले पर्याय उपलब्ध आहेत, त्यातूनच उद्याच्या कारभार्‍यांची निवड करण्याची मतदारांची मानसिकता तयार झाल्याचे दिसते आहे. याचाच अर्थ या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता दिसत आहे.

गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या राजकारणात गुन्हेगारीचा आणि गुन्हेगारांचाही मोठ्या प्रमाणात गवगवा झालेला आहे. गुन्हेगारीचा कलंक माथी असलेले काही महाभाग उजळ माथ्याने महापालिकेच्या राजकारणात स्थिरावल्याचे दिसत आहे. आजकालच्या राजकारणात प्रचलित झालेल्या ‘मॅन, मनी आणि मसल पॉवर’ मुळे यंदाच्या निवडणुकीतही बहुसंख्य राजकीय पक्षांनी अशा ‘बाहुबलींना’ उमेदवारी दिलेली दिसून येते. पूर्वी आपल्या बाहुबलावर महापालिकेच्या राजकारणात भलेही त्यांची सरशी झाली असेल, पण अशा मंडळींना यापुढे महापालिकेच्या दारातूनच माघारी घालविण्याची मानसिकता मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात तयार झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणातील गुन्हेगारीची वहिवाट आणि पायंडा पडलेली पायवाट यंदा मोडून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मतदारांच्या मनस्थितीचा अंदाज घेता आणखी एक बाब यंदा प्रकर्षाने जाणवून येत आहे. यापूर्वी महापालिकेच्या राजकारणात विरोधक म्हणून ज्यांना ज्यांना संधी मिळाली, त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असायची. त्यामुळे महापालिकेतील विरोधकांचा आवाज सत्ताधार्‍यांच्या बहुमतापुढे अतिशय क्षीण ठरायचा. त्याचा परिणाम म्हणून पाशवी बहुमताच्या जोरावर सत्ताधार्‍यांचा मनमानी कारभार रेटला जायचा. पण यावेळची मतदारांची एकूणच बदललेली मानसिकता विचारात घेता असे दिसते की महापालिकेत सत्ता कुणाचीही येवो, पण विरोधकांची संख्यासुध्दा त्यांच्या तोलामोलाचीच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे कारण म्हणजे यंदाच्या निवडणुकीत दिसून येत असलेली क्रॉस वोटिंगची चिन्हे. सत्ताधारी आणि विरोधक तोलामोलाने तुल्यबळ ठरल्यास महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या मनमानी कारभाराला चांगलाच चाप बसायला मदत होणार आहे.

निवडणुकीत उतरलेल्या बहुसंख्य सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी प्रचाराच्या निमित्ताने सगळा भाग पिंजून काढलेला आहे. प्रचारा दरम्यान त्यांनाही मतदारांच्या मनात असलेल्या महापालिकेच्या शुध्दीकरणाचा चांगलाच अंदाज आलेला आहे.  त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि झाडून सगळ्या उमेदवारांनी क्रॉस व्होटिंगचा धसका घेतल्याचे दिसत आहे. एकूणच काय तर यंदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेच्या राजकीय  शुध्दीकरणाची सुरूवात होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तसे झाले तर भविष्यात महापालिकेच्या विकासाची पहाट अवतरलेली बघायला मिळेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.