Tue, Jun 25, 2019 21:59होमपेज › Sangli › भाजपला मते मागायला तोंड नाही

भाजपला मते मागायला तोंड नाही

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:51PMसांगली : प्रतिनिधी

मोठ-मोठी दिलेली आश्‍वासने पूर्ण करू न शकल्याने भाजपकडून फसवणूक झाल्याचा तीव्र संताप जनतेत आहे. यामुळेच भाजपला मते मागायला तोंड नाही.  जे राज्य सांभाळू शकत नाहीत ते सांगली काय सांभाळणार, अशी जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. 

मराठा आरक्षणप्रश्‍नी शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडून दाखवावे, असेही ते म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारार्थ मारुती चौकात संयुक्त सभा झाली. यावेळी चव्हाण म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला महापूजेला जाऊ शकत नाहीत. सांगलीत प्रचाराला येऊ शकत नाहीत. यावरून राज्य कारभार कसा सुरू आहे ते कळून येते. 

ते पुढे म्हणाले, मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढल्यानंतर आता हा समाज आक्रमक बनला आहे. त्याला सामोरे जायची हिंमत मुख्यमंत्री  अथवा भाजपच्या कोणत्याच मंत्र्यांमध्ये नाही. यांच्या चुकीच्या कारभारामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. जे राज्य सांभाळू  शकत  नाहीत, ते सांगलीला काय सांभाळू शकणार आहेत. 

मराठा आरक्षणाबाबत  शिवसेनेने स्वाभिमान दाखविण्याची ही खरी वेळ आहे.  शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला नाहीतर त्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असेही ते शेवटी म्हणाले. माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची भाषणे झाली.प्रकाश आवाडे,  पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, प्रतीक पाटील,  विशाल पाटील, मंगेश चव्हाण, संजय (चिंटू) पवार, प्रमोद पवार, प्रियंका सदलगे, शैलजा कोरी, फिरोज पठाण, आरती वळवडे, पवित्रा केरीपाळे उपस्थित होते.