Thu, Jun 20, 2019 21:35होमपेज › Sangli › सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी?

सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी?

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:12AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून स्वतंत्र लढण्याच्या भूमिका जाहीर केल्या जात आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीही सुरू आहे. असे असताना विजयनगरात मात्र शुक्रवारी विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विजयनगर येथे राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील यांची एकत्र सभा होणार आहे. या सभेत होणार्‍या भाषणातून आघाडीचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विद्यमान सदस्यांसह अनेक इच्छुकांकडून आघाडीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपला रोखण्यासाठी राज्यपातळीवर आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेबाबत मात्र दोन्ही पक्षांकडून स्थानिक नेते तसेच कार्यकर्त्यांशी चर्चेने निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या सर्वच इच्छुकांनी प्रभागरचना आणि आरक्षणानुसार उमेदवारीसह प्रचारासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष सध्या महापालिकेत सत्ताधारी-विरोधक असले तरी गेल्या पाच वर्षांत सोयीनुसार एकत्रच असल्याचे दिसून आले होते.  आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक विकासकामांच्या उद्घाटनासाठी एकत्र येत आहेत. विजयनगर येथील  विजयनगर रेल्वे स्टेशन  मार्ग ते मल्हारराव होळकर रस्त्याचे मुख्य काम करण्यात आले आहे. तसेच विविध विकासकामांसह नागरी वस्त्यांतील आरक्षण उठविण्याचा निर्णयही एकत्र येऊन घेतला आहे. त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त नगरसेवक विष्णु माने यांनी दोन्ही पक्षांना एकत्र निमंत्रण देऊन काढला आहे. शुक्रवारी यानिमित्ताने शामनगर चौकात सायंकाळी पाच वाजता  संयुक्त सभाच होणार आहे. या कार्यक्रमास आमदार जयंत पाटील व काँग्रेसनेत्या जयश्री पाटील यांच्यासह महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते आदि उपस्थित राहणार आहेत.  या सभेतून अप्रत्यक्ष आघाडीचा संकेत दिला जाणार का? याची चर्चा आहे.

Tags :Sangli, municipal election, Congress NCP, alliance, sangli news,