Wed, Aug 21, 2019 14:47होमपेज › Sangli › मुलीवर बलात्कार: मिरजेतील एक दोषी

मुलीवर बलात्कार: मिरजेतील एक दोषी

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 23 2017 12:02AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मिरजेतील एकाला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी हा निर्णय दिला. याप्रकरणी दि. 29 रोजी अंतिम सुनावणी होणार असून त्यावेळी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गिरीष पुरषोत्तम गुमास्ते (वय 45, रा. ब्राह्मणपुरी, आष्टेकर वाडा, समर्थ चौक, मिरज) असे दोषी ठरवलेल्याचे नाव आहे.

दि. 4 ऑगस्ट 2015 रोजी पीडित मुलगी बेडग (ता. मिरज) येथे पुजेसाठी गेली होती. त्यादिवशी रात्री दहाच्या सुमारास गुमास्ते याने तिला कारमध्ये बसवून तिच्याशी अश्‍लील वर्तन केले.  त्यावेळी तिला धमकीही दिली. त्यानंतर दुसर्‍यादिवशी रात्री नऊच्या सुमारास मिरजेतील पीडितेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून तो घरात शिरला. त्यावेळी त्याने पीडितेवर  बलात्कार केला होता. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुमास्तेविरोधात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयात आज सुनावणी झाली.  याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विनायक देशपांडे यांनी काम पाहिले.