Wed, Apr 24, 2019 20:07होमपेज › Sangli › मिरज एमआयडीसीत फायरस्टेशन सुरू करा

मिरज एमआयडीसीत फायरस्टेशन सुरू करा

Published On: Dec 16 2017 1:48AM | Last Updated: Dec 15 2017 11:32PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

मिरज एमआयडीसीमध्ये  दहा दिवसांत फायर स्टेशन ( अग्निशमन विभाग) सुरू करा. त्यासाठी आवश्यक वीज जोडणी, पाणी, रस्ते, वाहन, वाहनचालक यांचीही तातडीने  कार्यवाही करा, असे आदेश जिल्हाधिकारी विजयकुमार  काळम - पाटील यांनी  शुक्रवारी  दिले. जिल्हा उद्योग मित्र बैठकीत  ते बोलत होते.  महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, व्यवस्थापक पूजा कुलकर्णी आदी   उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील  म्हणाले, सांगली शहराचा औद्योगिक विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.  एमआयडीसीत  रस्ते, पाणी, फायर स्टेशन, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आदि बाबी आवश्यक आहेत. संबंधित विभागांनी  प्रलंबित कामांचा निपटारा करून उद्योजकांना या सुविधा  द्याव्यात. 

 बिअर शॉपीला परवानगी दिल्याबाबत, एमआयडीसी कुपवाड मधील परिवहन विभागाचे टेस्ट ड्राईव्ह ट्रॅक तातडीने बंद करणे,  उद्योगामुळे होणारे  प्रदूषण, एमआयडीसीमधील एलबीटी वसुली, वीज खांब, व्हॅट कायद्यांतर्गत दिलेल्या नोटिसांना स्थगिती किंवा मुदतवाढ देणे, मिरज एमआडीसी क्षेत्रात  झाडे लावणे,दूषित पाणीपुरवठा, गोंविदराव मराठे आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, गटाराची व्यवस्था  आदि विषयांवर   चर्चा करण्यात आली. संबंधिताना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.