सांगली ः प्रतिनिधी
स्पष्टवक्ते असलेले काँग्रेस नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी येथील कार्यक्रमात जोरदार राजकीय टोलेबाजी केली. त्याला उपस्थितांनी मनमुराद दाद दिली. निमित्त होते दिवंगत काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे.
या कार्यक्रमात अनेक नेत्यांच्या कुरघोड्या आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकारणावर डॉ. कदम यांनी फटकेबाजी करीत ‘फॅक्ट’ मांडले. त्यांच्या या फटकेबाजीचा रोख काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह खासदार संजय पाटील यांच्याकडेही होता. मात्र त्यांनीही तितक्याच प्रांजळपणे त्यांच्या भाषणाला दादही दिली. काँग्रेसमधील हायकमांड आणि त्यांची कार्यपद्धतीही डॉ. कदम यांनी उघड केली. ते म्हणाले, आमचा सर्व खेळ दिल्लीत चालतो. त्याचे कर्ते करविते अहमद पटेलच असतात. अर्थात जे निर्णय होतात ते आपसूक मानले जातात. निष्ठेला संधी मिळते हीच काँग्रेसची संस्कृती आहे.
मदन पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत डॉ.कदम म्हणाले, त्यांच्यासारखा जिगरबाज नेता दुसरा होणे नाही. त्यांचे जिल्ह्यावर वर्चस्व होते. पण राजकारणात संधी कोणाला मिळते, कोणाला नाही. म्हणूनच त्यांच्या हाताखाली काम करणारे काहीजण मंत्री झाले तरी त्याची त्यांनी वाईट कधीच वाटून घेतले नाही. राजकारणात असे होतच राहते. त्यामुळेच त्यांच्या पश्चात त्यांचे कार्यकर्ते निष्ठावंतपणे पाठीशी आहेत. नाहीतर आज निष्ठा शिल्लकच राहिलेली नाही.
खासदार पाटील यांच्याबद्दल ते म्हणाले, हा संजय आमचाच की. कधी तिकडे गेला अन् खासदार झाला ते समजलेच नाही. अर्थात योग्यवेळी योग्य निर्णय आणि संधी त्याचबरोबर नशीबही चालून यावे लागते. पण राजकारण निवडणुकीपुरतेच करावे. तो महाराजांच्या नादी लागतो, असे त्यांनी म्हणताच उपस्थितांत हशा पिकला. मी फाटका माणूस, पण लोकांनी ताकद दिली. 33 वर्षे आमदार आहे. दिल्लीला न जाता 20 वर्षे मंत्रीही झालो.
डॉ. कदम म्हणाले, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील या सात्विक पर्सनॅलिटी असलेल्या नेत्या आहेत. त्यांना राजकारणात पूर्ण ताकद देऊ. पण महापालिकेतील टोळी त्यांना फसवून कोणत्या भानगडी, टक्केवारी करते हे कळत नाही. मंत्री झालो तरी ते मला कधी कळलेच नाही.
वसंतदादांच्या नावच्या मार्केट यार्डात मी कधीच लक्ष घातले नव्हते. अनेकांनी घातले. आजअखेर सर्वांनी खाऊनही 35 कोटींची शिल्लक आहे. या वक्तव्यावरूनही हास्याचे फवारे फुलले. या टोलेबाजीनंतर प्रमुख पाहुणे अशोक चव्हाण म्हणाले, डॉ. कदम यांच्या भाषणानंतर बोलण्यासारखे काही शिल्लक राहिलेच नाही.