Tue, Nov 13, 2018 05:56होमपेज › Sangli › मुख्यमंत्र्यांच्या स्थगिती आदेशानंतरही मनपाकडून चुुकीची एलबीटी कारवाई

मुख्यमंत्र्यांच्या स्थगिती आदेशानंतरही मनपाकडून चुुकीची एलबीटी कारवाई

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 9:21PM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

महापालिकेच्या एलबीटी वसुली व असेसमेंट तपासणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. त्याचे तोंडी आदेशही झाले. आदेश लवकरच महापालिकेला प्राप्त होईल. तरीही चुकीच्या पद्धतीने एलबीटी वसुलीसाठी व्यापार्‍यांवर कारवाई सुरूच ठेवली आहे, असा आरोप व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी पत्रकार बैठकीत केला.  अधिकार्‍यांनी हा उद्योग बंद करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, नागपूर अधिवेशनात आमदार सुधीर गाडगीळ यांनी एलबीटी वसुलीत व्यापार्‍यांवर चुकीची कारवाई सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एलबीटी वसुलीला स्थगिती दिली. आमदारांनी त्याबाबत महापालिकेला कळविलेही. अध्यादेश दोन दिवसांतच महापालिकेला प्राप्त होणार आहे. तरीही आदेश प्राप्त झाला नसल्याचा बाऊ करून कारवाईचा उद्योग सुरू केला आहे.

शहा म्हणाले, महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून नोटिसांचे वाटप, जप्तीच्या धमक्या दिल्या जात आहेत. अधिकार्‍यांचा मुख्यमंत्र्यावर विश्‍वास नाही का? इतका उतावीळपणा कशासाठी सुरू आहे? महापालिकेने स्थगिती आदेशाबाबत नगरविकास खाते, आमदारांशी चर्चा करण्याची गरज होती.  ते म्हणाले, काही अधिकार्‍यांनी आदेशाची वाट न पाहताच कारवाई सुरू ठेवली आहे. जाणूनबुजून फौजदारी खटले दाखल केले जात आहेत. आयुक्तांनी व्यापार्‍यावरील कारवाई तातडीने थांबवावी, अन्यथा कायदेशीर लढा उभारावा लागेल.