Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Sangli › भूमी कार्यालयात शुकशुकाटच

भूमी कार्यालयात शुकशुकाटच

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 22 2017 9:25PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

शहरातील भूमी प्रॉपकॉर्न संस्थेत ठेवलेली दहा लाखांची ठेव परत न दिल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर या संस्थेच्या ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. ठेवीदारांनी ठेवी परत मिळविण्यासाठी संस्थेच्या पुष्पराज चौकातील कार्यालयात गर्दी केली होती. शुक्रवारी मात्र भूमीच्या कार्यालयात शुकशुकाट असल्याचे दिसून आले. तेथील कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांविषयी विचारले असता अधिकारी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ठेवीदार आक्रमक बनल्याचे दिसून आले.

याप्रकरणी इनाम धामणीतील मनोज कदम याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोजकडे सुशीला पाटील यांनी त्यांच्या व सुनेच्या नावावर ठेव ठेवण्यासाठी दहा लाख रुपये 2014 मध्ये दिले होते. त्यानंतर सलग सोळा महिने त्या ठेवीवरील व्याजही पाटील यांना मिळाले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी ठेव परत देण्याविषयी तगादा लावला होता. मात्र आजतागायत त्याने ठेवीची रक्कम परत दिली नाही. त्यामुळे त्यांनी मंगळवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

दरम्यान, भूमी संस्थेतील ठेवींप्रकरणी फसवणूक झाल्याचे वृत्त समजताच गुरुवारी ठेवीदारांनी संस्थेच्या कार्यालयात ठेवी परत मिळविण्यासाठी गर्दी केली होती. मात्र जबाबदार अधिकारी नसल्याने त्यांना ठोस उत्तरे मिळाली नाहीत. शुक्रवारी मात्र दिवसभर या कार्यालयात शुकशुकाट होता. दोन महिला कर्मचार्‍यांव्यतिरिक्त कार्यालयात कोणीही नसल्याचे दिसून आले.