होमपेज › Sangli › मार्केट यार्डात दुकानातून दीड लाख लंपास

मार्केट यार्डात दुकानातून दीड लाख लंपास

Published On: Dec 16 2017 1:47AM | Last Updated: Dec 15 2017 11:53PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

सांगली मार्केट यार्डातील एका गूळ व्यापार्‍याच्या दुकानातून 1 लाख 45 हजारांची रोकड लंपास करण्यात आली. अज्ञात चार मुली आणि दोन महिलांनी हा प्रकार केल्याची तक्रार व्यापार्‍यांनी केली आहे. बाजार समितीने मार्केट यार्डात चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मात्र ही प्रक्रिया अजून टेंडरमध्येच अडकली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत बाळासाहेब बापूसाहेब चौगुले (वय 61, रा. सैनिकनगर, विजयनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या हर्षल ट्रेडर्स या दुकानासमोर बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान चार मुली व दोन महिला आल्या. या मुली व महिलांनी पैसे मागण्यासाठी ‘दे दो दे दो .. ’ असा दंगा सुरू केला. दुकान मालकांनी त्यांना हाकलून लावले. शेजारच्या दुकानासमोर असाच प्रकार सुरू झाला. त्यानंतर चौगुले शेजारच्या दुकानाकडे गेले. तोपर्यंत उघड्या तिजोरीतून 1.45 लाख रुपये लंपास झाले.  सांगली चेंबर ऑफ कॉमर्सने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे निवेदन देत सुरक्षा व्यवस्था व्यापक व मजबूत करण्याची मागणी केली. 

सांगली मार्केट यार्डचे आवार 82   एकर जागेवर वसले आहे. 365 प्लॉटवर दुकाने आहेत. याशिवाय 78 दुकानगाळेही आहेत. विष्णुअण्णा फळे व भाजीपाला मार्केट 15 एकर जागेवर वसले आहे. 108 दुकानगाळे आहेत. सांगली मार्केट यार्डात चोर्‍यांचे प्रकार सतत घडत असतात.सन 2014 मध्ये हळद चोरीचा प्रकार चव्हाट्यावर आला. हळदीची सुमारे 250 पोती चोरली होती. त्याची 20 लाख रुपये किंमत होती. मार्केट यार्डात अजूनही किरकोळ, भुरट्या चोर्‍यांचे प्रकार घडत आहेत.

महिनाभरात हळदीचा सिझन सुरू होत आहे. चोरीचे प्रकार घडण्याची भीती व्यापार्‍यांमध्ये आहे.  बाजार समितीने सांगली मार्केट यार्ड तसेच विष्णुअण्णा फळे व भाजीपाला मार्केटमध्ये 60 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. टेंडर मागवले होते. सीसीटीव्ही  कॅमेरे अजून टेंडरमध्येच अडकले आहेत. मार्केट यार्डात चोर्‍या मात्र अजुन सुरूच आहेत.