Sun, May 26, 2019 21:43होमपेज › Sangli › दख्खन जत्रेत 32 लाखांची उच्चांकी उलाढाल

दख्खन जत्रेत 32 लाखांची उच्चांकी उलाढाल

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:04AMसांगली  :प्रतिनिधी

इस्लामपूर येथे झालेल्या दख्खन जत्रेत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध गृहोपयोगी वस्तू व खाद्यपदार्थांची 32 लाखांची उच्चांकी विक्री झाली. सांगली जिल्ह्याबरोबरच सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, सोलापूर जिल्ह्यातून  126 महिला बचत गटांचे 100 स्टॉल्स होते. उच्चांकी विक्रीमुळे सहभागी महिला बचत गटांमध्ये उत्साह संचारला आहे. सर्वाधिक विक्री केलेल्या तीन बचत गटांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. 

इस्लामपूर येथे रविवारी कृषी महोत्सव व दख्खन जत्रा सुरू झाली.गुरूवारी समारोप झाला. दख्खन जत्रेत महिला बचत गटांचे खाद्य पदार्थ विक्रीचे 67 व विविध गृहोपयोगी वस्तुंचे 59 स्टॉल होते. पाच दिवसात बचत गटांकडील खाद्यपदार्थ व गृहोपयोगी वस्तूंची 32 लाखांची विक्री झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, अरूण राजमाने, तम्मनगौडा रवि, ब्रह्मदेव पडळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांनी दख्खन जत्रा यशस्वी व्हावी व सहभागी महिला बचत गटांना अधिकाधिक आर्थिक लाभ व्हावा यासाठी प्रयत्न केले.  

बचत गटांचा गौरव

सर्वाधिक विक्री केलेल्या पहिल्या तीन बचत गटांना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते  बक्षिस देऊन गौरव करण्यत आला. टाकळीचा मनस्वी बचत गट व सांगलीच्या स्वामी समर्थ बचत गटाने प्रथम क्रमांक पटकावला.  द्वितीय क्रमांक श्रेयस महिला बचत गट गुहागर (जि. रत्नागिरी), तृतीय क्रमांक बिसूरच्या मानिनी महिला बचत गटाने मिळविला. प्रेरणा (नाशिक), जयमल्हार (एकंबे, जि. सातारा), श्रीराम (वाळवा) या बचत गटांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. दख्खन जत्रेमुळे इस्लामपूर शहरवासियांनी पारंपारिक व वैविध्यपूर्ण खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.