Fri, Apr 26, 2019 09:24होमपेज › Sangli › हरियाणाच्या एकाला अटक

हरियाणाच्या एकाला अटक

Published On: Dec 16 2017 1:47AM | Last Updated: Dec 15 2017 11:45PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

शहरातील तांदूळ व्यापारी आबीद शिवानी (वय 50) यांचे अपहरण केल्याप्रकरणी सांगली पोलिसांनी हरियाणातील एका संशयिताला अटक केली. मोहम्मद हशीम शहाबुद्दीन (वय 22, रा. रूपडागा, जि. पलवल, हरियाणा) असे त्याचे नाव आहे.  अन्य तीन संशयित फरारी आहेत. सांगली पोलिसांनी हरियाणात जाऊन ही कारवाई केली. त्याला दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी व्यापार्‍याचे बंधू अमीन शिवानी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मदसह त्याच्या साथीदारांनी गेल्या आठवड्यात शिवानी यांच्याशी संपर्क साधला होता. व्यापाराविषयी बोलणे करायचे असल्याचे सांगून त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. त्यानंतर शिवानी दिल्लीत पोहोचल्यानंतर मोहम्मदसह चौघा संशयितांनी त्यांना एका कारमधून नेले. त्यानंतर काही वेळाने संशयितांपैकी एकाने शिवानी यांच्या मोबाईलवरून त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला. 

शिवानी यांचे अपहरण केले असून 12 लाख रुपये देण्याची मागणीही करण्यात आली. त्यानंतर तीन लाख रुपयांवर सौदा ठरला. शिवानी यांच्या घरच्यांनी  बँकेत संशयिताच्या खात्यावर पैसे जमा केल्यानंतर शिवानी यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर शिवानी सांगलीत आले. ते सांगलीत आल्यानंतर येथील एक पथक त्यांना घेऊन दिल्लीला गेले होते. पथक रूपडागा गावात पोहोचले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोहम्मदला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर इतर संशयितांचा शोध घेतला मात्र ते फरार झाले होते. पोलिसांचे पथक आज मोहम्मदला घेऊन सांगलीत पोहोचले. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाने ही कारवाई  केली.