Fri, Mar 22, 2019 08:16होमपेज › Sangli › ऐंशी टक्के स्थानिकांनाच नोकर्‍या द्या

ऐंशी टक्के स्थानिकांनाच नोकर्‍या द्या

Published On: Dec 16 2017 1:48AM | Last Updated: Dec 15 2017 11:24PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये 80 टक्के स्थानिक कर्मचार्‍यांना नोकरीची संधी दिलीच पाहिजे, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी विजयकुमार कायम-पाटील यांनी उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांना दिले. स्थानिक कामगारांना नोकर्‍यांमध्ये डावलून परप्रांतीयांना संधी दिली जाते. याबद्दल मनसेने जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी आंदोलन उभारले होते. त्यासंदर्भात आज  काळम पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी हा निर्णय झाल्याचे सावंत म्हणाले. ही संधी न देणार्‍या कंपन्यांविरुद्ध चौकशी करून कारवाईचेही जिल्हाधिकार्‍यांनी   कोळेकर यांना आदेश दिल्याचे ते म्हणाले.

सावंत म्हणाले, कायद्याने जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक संस्थांमध्ये 80 टक्के स्थानिक कर्मचार्‍यांना संधी देणे बंधनकारक आहे. परंतु स्थानिकांचे हक्क मारून प्रसंगी किमान वेतनाचा कायदा धाब्यावर बसवत परप्रांतीय कामगारांची नियुक्ती केली जात होती. याविरुद्ध मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यात आम्ही मनसे स्टाईल आंदोलन पुकारले होते. याबाबत सुचना देऊनही प्रशासनाने कारवाई केली नव्हती. याबद्दल आम्ही श्री. कोळेकर यांच्याकडे तक्रार केली तर त्यांनी हे अधिकार त्यांना नसल्याचे सांगितले. 

जिल्हाधिकार्‍यांना अधिकार असल्याने आज  कोळेकर यांच्यासमवेतच निर्णयासाठी बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी कायद्यांतील तरतुदीनुसार  अंमलबजावणीचे आदेश दिले. त्यामुळे आता 80 टक्के स्थानिक कर्मचार्‍यांना न्याय मिळणार आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले, दयानंद मलपे, विनय पाटील, अमित पाटील, कुमार सावंत उपस्थित होते.