Sun, Jan 20, 2019 18:24होमपेज › Sangli › ‘तळीरामांच्या’ विमानाला भेसळीचं ‘इंधन’!

‘तळीरामांच्या’ विमानाला भेसळीचं ‘इंधन’!

Published On: Dec 05 2017 1:43AM | Last Updated: Dec 04 2017 8:01PM

बुकमार्क करा

सांगली : सुनील कदम

मुळातच ‘तळीराम’ म्हणजे सदासर्वदा विमानात बसून हवेत तरंगणारी जमात. त्यांना असली काय आणि  नकली काय,  ‘कीक’ बसल्याशी मतलब असतो. तळीरामांच्या या ‘बेसावधपणाचा’ नेमका फायदा उचलून आज  जिल्ह्यात हुबळी मेड आणि बनावट देशी-विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क खात्याचे त्याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. अनेक दारू दुकानांमध्ये आणि बारमध्ये नामवंत कंपन्यांच्या ब्रँडच्या नावाखाली हुबळी मेड आणि बनावट दारूची विक्री सुरू असल्याचे दिसत आहे. नामवंत कंपन्यांची साधारणत: 150 रुपयांची बाटली 160 रुपयांना  विकून बाटलीमागे केवळ 10 रूपये मिळवण्याऐवजी 40 रूपयांची बनावट दारू 150 रूपयांना विकून एका बाटलीमागे जवळपास शंभर रूपये कमावण्याचा फंडा अनेक दारू दुकानांमध्ये राबविला जात आहे. 

प्रामुख्याने ग्रामीण भागातील काही बार आणि देशी दारू दुकानांमध्ये हा उद्योग सुरू असल्याचे दिसते. शहरी भागातील काही बारमध्येही या बनावट दारूची विक्री होताना दिसत आहे. ही बनावट दारू बाह्य रूपावरून किंवा बाटलीच्या आकारावरूनसुध्दा सहजासहजी ओळखू येत नाही. दररोज एकाच ब्रँडची दारू पिणार्‍याला मात्र ही दारू पिल्यानंतर लगेचच त्यातील बनावटगिरी ओळखता येते. मात्र मिळेल ती पिणारे किंवा कधीतरी पिणार्‍यांच्या गळ्यात ही बनावट दारू नेमकी मारली जाते.  अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून या बनावट दारूचा रतीब घातला जात असल्याचे दिसत आहे.

पूर्वी बनावट किंवा हुबळीमेड दारू ही प्रामुख्याने कर्नाटकच्या सीमावर्ती भागातून आणि गोव्यातून येत होती. मात्र अशी बनावट दारू बनविण्याचे तंत्र अवगत करून काहीजणांनी या जिल्ह्यातच ठिकठिकाणी हा ‘लघुउद्योग’ सुरू केल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील या बनावट दारूची आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्ये ‘निर्यात’ केली जाताना दिसत आहे. 
या प्रकारांना वेळीच अटकाव केला नाही तर बनावट दारूच्या बाबतीत अल्पावधीतच जिल्हा पूर्णपणे ‘स्वावलंबी’ झालेला  दिसेल.