Mon, Mar 25, 2019 13:12होमपेज › Sangli › शिक्षक, संस्थाचालकांचा धडक मोर्चा

शिक्षक, संस्थाचालकांचा धडक मोर्चा

Published On: Jan 21 2018 2:54AM | Last Updated: Jan 20 2018 8:20PMसांगली : प्रतिनिधी

राज्य सरकारने शिक्षण क्षेत्र खासगी कंपन्यांना देण्याचा घाट  घातला आहे, तो थांबवावा. दहा विद्यार्थी पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, वेतनेत्तर अनुदान त्वरित द्यावे, आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षण संस्थाचालक आज रस्त्यावर उतरले. सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. 

दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा, शाळा इमारतींना कुलूप  लावण्याचा इशारा मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी दिला. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून दुपारी दोनच्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली. माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार शरद पाटील, राज्य मुख्याध्यापक  महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, शिक्षण संस्था संघटनेचे खजिनदार रावसाहेब पाटील, आर. एस. चोपडे, एस. डी. लाड, सुभाष माने, राजेंद्र नागरगोजे, अशोक थोरात, विनायक शिंदे, रघुनाथ सातपुते आदी सहभागी झाले होते. तसेच सांगली शहरासह जिल्ह्यातील शिक्षकही मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  भाषणे झाली. त्यामध्ये मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा, प्रसंगी परीक्षावर बहिष्कार टाकत शाळा इमारतींना कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळातर्फे मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्याकडे देण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे,  विद्यार्थी संख्येवर आधारीत संच मान्यतेचा आदेश रद्द करावा. इमारत भाडे मिळावे, थकीत वेतनेत्तर अनुदान तातडीने द्यावे,  मुक्त शाळा जी.आर.  रद्द करावा, पटसंख्येच्या आधारे शाळा बंद करू नये, शाळा तेथे मुख्याध्यापक पद असावे या मागण्या केल्या आहेत.