Wed, May 22, 2019 17:06होमपेज › Sangli › जिल्हा परिषदेच्या १६ शाळा बंद होणार

जिल्हा परिषदेच्या १६ शाळा बंद होणार

Published On: Dec 03 2017 1:25AM | Last Updated: Dec 02 2017 10:43PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

कमी पटाच्या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याबाबत  शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार सांगली जिल्हा परिषदेच्या 16 प्राथमिक शाळा बंद होणार आहेत. ही कार्यवाही लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान कमी पटामुळे राज्यातील सुमारे 1300 प्राथमिक शाळांवर गंडांतर आले आहे. 
प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या शिक्षण संचालकांनी  राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना तातडीचे परिपत्रक पाठविले आहे.

कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत चांगल्या गुणवत्तेमुळे पटसंख्या वाढत असलेल्या शाळेत समायोजन करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान जिल्ह्यात दहाहून कमी पटसंख्या असलेल्या 16 प्राथमिक शाळा आहेत. या शाळा आता बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या 16 शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नजिकच्या कोणत्या शाळेत समायोजन करायचे याबाबतही माहिती जिल्हा परिषदेने तयार केली असल्याचे वृत्त आहे. 

शिक्षण संचालकांनी पाठवलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ‘राज्यात पालकांमध्ये गुणवत्तेबाबत चांगलीच जागरुकता आली आहे. त्यामुळे चांगली गुणवत्ता असलेल्या शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. कमी गुणवत्तेच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मधील तरतुदींचे उल्लंघन न करता कमी पटाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या चांगली गुणवत्तेच्या शाळेत समायोजन करणे योग्य आहे’. 

दरम्यान कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या कमी होत असल्याच्या शिक्षण संचालकांच्या मताशी शिक्षक संघटना सहमत नाहीत. शाळेचा पट कमी होण्यास केवळ गुणवत्ताच कारणीभूत नाही. स्थानिक राजकीय व्यक्तींच्या खासगी शाळा, नवीन स्वयंअर्थसहायित शाळांना दिलेली मंजुरी हेही कारणीभूत आहे. कमी पटाच्या शाळेत गुणवत्ता कमी आहे याला आधार काय, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्‍न शिक्षक आमदारांकडून आक्रमकपणे मांडला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.