Sun, Apr 21, 2019 02:20होमपेज › Sangli › तोडफोड, तणाव अन् पोलिसांचा संयम

तोडफोड, तणाव अन् पोलिसांचा संयम

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 9:38PM

बुकमार्क करा
सांगली ः अभिजित बसुगडे

अनिकेत कोथळेच्या खुनानंतर मानसिकदृष्ट्या काहीसे खचलेले जिल्हा पोलिस दल पुन्हा सक्षमपणे उभे राहिल्याचे गेल्या दोन दिवसांत दिसून आले. वर्षअखेरच्या बंदोबस्तापासून सातत्याने रस्त्यावर असणार्‍या पोलिसांनी कमालीच्या सहनशक्तीचे दर्शन घडविले. जिल्ह्यात होणारी तोडफोड, जाळपोळ आणि तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी पाळलेला संयम वाखाणण्याजोगा होता.

कोथळे प्रकरणातून पोलिस सावरल्याचे दिसून आले. भीमा-कोरेगाव  येथील घटनांच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारपासून जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यात बुधवारी बंदची हाक दिल्यानंतर पोलिस मंगळवारीच अलर्ट झाले होते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मंगळवारी रात्रीच परिस्थितीचा अंदाज घेऊन बंदोबस्ताचे वाटप केले.

ते स्वतः जिल्ह्यात फेरफटका मारून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. बुधवारी सकाळपासून कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. सकाळी साडेअकरापर्यंत परिस्थिती सामान्य होती. जमाव निवेदन देण्यासाठी निघाला अन् समाजकंटकांनी तोडफोडीला प्रारंभ केला. त्याची सुरुवात शहरातील काही ठिकाणांपासून झाली. मात्र पोलिसांनी परिस्थिती ओळखून मारूती चौक व परिसरात आधीपासूनच मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

तेथील फलक उतरवल्यानंतर जमाव निघून गेला. मात्र काही समाजकंटकांनी दंगल घडविण्याच्या उद्देशाने दुकाने, हातगाडे यांना टार्गेट केले. शहरात एकाचवेळी अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडत होत्या. यावेळी मारूती चौकात दुसरा गट जमा झाल्याने पोलिसांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली. यातच मारूती चौकासह शहरात तणाव वाढू लागला.

काही ठिकाणी किरकोळ दगडफेकीच्या घटनाही घडल्या. हे सर्व प्रकार सुरू असताना मारूती चौकात दुपारी दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे तणावात आणखी भर पडली. इतक्यात पोलिसांनी फौजफाट्यासह दोन्ही गटांच्या मध्येच ठाण मांडले. मोठ्या प्रमाणात पोलिस आल्याचे पाहून दोन्ही गट पांगले. मात्र त्याचे पडसाद शहरात उमटण्याची शक्यता होती. त्यातच एक गट गणपती मंदिराजवळ थांबला होता. पोलिसांमधील वरिष्ठ अधिकारी प्रत्येकाची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते.

परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली तरी पोलिसांनी त्याही परिस्थितीत संयम सोडला नाही. एकही काठी न उगारता परिस्थिती नियंत्रणात आणली. अजूनही सर्वत्र पोलिस सतर्क असल्याचे दिसून येत आहे. मारूती चौकातील वाढत असलेला तणाव पाहून पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी जमावात जाऊन कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांची समजूत घालून तसेच दोषींवर कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर तणाव काहीसा निवळला. दरम्यानच्या काळात तोडफोड करणारे समाजकंटक पसार झाले होते.

दुपारी तीननंतर परिस्थिती पूर्वपदावर आली.  गेल्या काही महिन्यांपासून अनिकेत कोथळे खून प्रकरणामुळे  मानसिकदृष्ट्या काहीसे खचलेले पोलिस पुन्हा चार्ज झाल्याचे दिसून आले. दोनहून अधिक दंगलीचा अनुभव असणारे पोलिस यावेळी कमालीचा संयम बाळगून होते. त्यामुळे जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. एकंदरीत जिल्ह्यातील नियंत्रणात असलेली परिस्थिती पाहता पोलिस दल सक्षमपणे पुन्हा उभारल्याचे संकेत यातून मिळाले.