Thu, Aug 22, 2019 03:50होमपेज › Sangli › धरणग्रस्तांचा लवकरच मोर्चा

धरणग्रस्तांचा लवकरच मोर्चा

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 19 2018 11:59PMवाळवा : प्रतिनिधी

वारणा धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन होण्यासाठी यापुढचे आंदोलन जोरदार  होणार आहे. अखेरच्या लढ्यासाठी आता धरणग्रस्तांनी सज्ज रहावे, असे आवाहन धरणग्रस्तांचे  नेते गौरव नायकवडी यांनी येथे केले. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील धरणग्रस्तांचा मेळावा येथील हुतात्मा विद्यालयासमोर आयोजित करण्यात आला होता. भारत पाटील अध्यक्षस्थानी होते.  नायकवडी म्हणाले, संघटनेमध्ये कोणतीही फूट पडू न देता महाराष्ट्रातील अनेक आंदोलकांना न्याय देण्यासाठी यापुढील काळात सर्वांनी एकजुटीने संघर्ष करूया. 

प्रा. राजा माळगी म्हणाले, धरणग्रस्तांनी आता रडत बसण्यापेक्षा लढण्याची आणि हिसकावून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळणार नाही. प्रा. सतीश चौगुले म्हणाले, संपूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही.  धरणग्रस्तांच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहू नये. भारत पाटील म्हणाले, धरणग्रस्तांचे विकसनशील पुनर्वसन झाले पाहिजे. यावेळी उमेश कानडे, नामदेव नांगरे, मुसा मुल्ला आदींची भाषणे झाली. धरणग्रस्त नेते राजाराम पाटील, संपतराव बेलवलकर, मारूती सोनवणे, श्रीपती बुवा, इब्राहिम वारुसे आदिंसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणग्रस्तांचा मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. 

नायकवडी यांनी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारावे, असा ठराव करण्यात आला. पुनर्वसनाच्या  जमिनीसाठी असणार्‍या अटी कमी कराव्यात. पुनर्वसनासाठी लागणारी जमीन संपादन करावी. आष्टा, येलूर, बोरगाव आदी वसाहतीमधील अतिक्रमणे काढावीत. ज्या गावांमध्ये धरणग्रस्तांची घरे झाली आहेत, त्या भूखंडांचा 7/12 धरणग्रस्तांच्या नावे निघावा. तसा आदेश काढावा. शासनाच्या नियमाप्रमाणे धरणग्रस्तांना राखीव कोट्यातून सरकारी नोकरी उपलब्ध करून द्यावी, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.