Tue, May 21, 2019 00:35होमपेज › Sangli › भ्रष्ट काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे सांगलीची अधोगती

भ्रष्ट काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे सांगलीची अधोगती

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 26 2018 1:39AMसांगली : प्रतिनिधी 

गेल्या वीस वर्षांपासून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांच्या  भ्रष्ट कारभारामुळे हे शहर मागास राहिले आहे. शहराची अधोगती झाली आहे.  त्यामुळे या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या आघाडीला धडा शिकवा, असे आवाहन  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. विजयनगर येथे चाणक्य चौकात प्रभाग 8 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.  दीपक शिंदे- म्हैसाळकर, राजेंद्र कुंभार, कृष्णा राठोड आदी उपस्थित होते. 

ना. पाटील म्हणाले, दोन्ही पक्षांनी आलटून पालटून महापालिकेची सत्ता उपभोगली. शहराचा विकास करण्याऐवजी रस्ते, गटारीची निकृष्ट कामे केली. त्यामुळे लोकांना रस्त्यावरून व्यवस्थित चालताही येत नाही. गटारीतील पाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचल्याने विविध आजारामुळे रुग्णांची संख्या वाढली.  ते म्हणाले, लोकांना मनोरंजनासाठी कोणतेही ठिकाण नाही. चांगले उद्यान नाही. खेळण्यासाठी सुसज्ज मैदान नाही. चांगली भाजी मंडई नाही. आरोग्य सुविधा चांगल्या नाहीत. सुमारे सातशे कोटी रुपयाचे बजेट असतानाही  या तिन्ही शहराचा विकास झाला नाही. या दोन्ही पक्षाच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि मलिदा लाटण्यामुळे शहराची ही स्थिती झाली आहे.

भाजपपुढे आपला टिकाव लागणार नाही, हे लक्षात आल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. मात्र सांगलीकर जनता सुजाण आहे. भाजपच्या रुपाने चांगला पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध झाला आहे. केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यातही पक्षाला संधी मिळाली आहे. त्याप्रमाणे या शहराच्या विकासासाठी यावेळी बदल करण्यासाठी निवडणुकीत त्यांना धडा शिकवा.