Mon, Apr 22, 2019 03:45होमपेज › Sangli › कोपर्डी निकालाने विकृत प्रवृत्तींना जरब

कोपर्डी निकालाने विकृत प्रवृत्तींना जरब

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

कोपर्डी (ता. कर्जत) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अमानुषपणे करेलेल्या खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेचे सर्वत्र स्वागत होत आहे. फाशीच्या शिक्षेमुळे विकृत प्रवृत्तींना जरब बसेल. गुन्हेगारी, विकृत प्रवृत्तींना हा कडक संदेश आहे. कायद्याचा धाक महत्त्वाचा आहे. तो यानिमित्ताने निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया समाजातील विविधस्तरातून व्यक्त झाली.

 सुधारण्याच्या पलीकडे गेलेल्यांना फाशीच  योग्य : अ‍ॅड. के. डी. शिंदे  कायद्याचे जाणकार व कामगार नेते  अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले, कोपर्डीप्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. न्यायालयाचा फाशीचा निर्णय स्वागतार्ह आहे. अल्पवयीन मुलीवर केलेला बलात्कार आणि अमानुष खून यामागे निश्‍चितपणे कट आहे. अचानकपणे घडलेला हा प्रकार नाही. सुधारण्याच्या पलिकडे गेलेल्या विकृतांना जगण्याचा अधिकारच नाही. त्यांना फाशीची शिक्षाच योग्य आहे.

समाजातील विकृत प्रवृत्तींना हा धडा आहे. फाशीच्या शिक्षेने कायद्याचा धाक निर्माण झालेला आहे.  शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी : विजयसिंह महाडिक  अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह महाडिक म्हणाले, कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि क्रूरपणे केलेला खून हा प्रकार अतिशय भयंकर होता. कोपर्डीप्रकरणी दोषींना फाशीसाठी महाराष्ट्र, देश आणि परदेशातही 58 ते 60 मराठा क्रांती मोर्चे निघाले. तिन्ही आरोपींना फाशीच्या शिक्षेचा निकाल योग्य आहे. य शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी. 

 गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब : पृथ्वीराज पाटील

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि खून याचे पडसाद राज्य, देशात उमटले. या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा होणे गरजेचे होते. न्यायालयाने योग्य निर्णय दिला आहे. फाशीच्या शिक्षेने गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब बसेल. 

 क्रांती मोर्चातील सर्व जाती, धर्माच्या लोकांचे यश : डॉ. संजय पाटील

मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक डॉ. संजय पाटील म्हणाले, अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्या अतिशय अमानुष होती. आरोपींना फाशीच्या शिक्षेसाठी राज्यात मराठा क्रांती मोर्चे अभूतपूर्व संख्येने निघाले. आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेने न्याय मिळाला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा होण्यास तपास  यंत्रणेतील पोलिस खाते, साक्षीदार, सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम, न्यायालय तसेच मराठा क्रांती मोर्चात सहभाग घेतलेले सर्व जाती, धर्माचे नागरिक या सर्वांचे योगदान लाभले आहे. 
 

महिलांचे आत्मबल वाढविणारा निकाल : छायाताई खरमाटे

जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती छायाताई खरमाटे म्हणाल्या, कोपर्डी प्रकरणाचा निकाल समजल्यानंतर खूप आनंद झाला. समस्त महिलांचे आत्मबल वाढविणारा हा निकाल आहे. आरोपीस केलेल्या कृत्याची शिक्षा देणारा, आरोपीस गुन्ह्यात साथ देणार्‍यांना फाशीची शिक्षा देणारा हा निकाल  देशातील इतर राज्यांनाही मार्गदर्शक ठरेल. या निकालाबद्दल न्यायव्यवस्था तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचेही एक महिला म्हणून मी मनस्वी अभिनंदन करते, आभार मानते. 

 नराधमांना फाशीच्या शिक्षेने समाधान : हेमा देसाई 

जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा हेमा देसाई म्हणाल्या, कोपर्डीप्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा झाल्याने समाधानी आहोत. या नराधमांना जगण्याचा अधिकारच नाही. मराठा समाज या शिक्षेची आतुरतेने वाट पहात होता. शिक्षा झालेले आरोपी आता उच्च न्यायालयात जातील, पण तिथेही फास्ट ट्रॅकवर सुनावणी व्हावी. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे. 

  तिघांच्या फाशीबद्दल समाधानी : ए. डी. पाटील

मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक ए. डी. पाटील म्हणाले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून हा प्रकार अतिशय भयंकर होता. अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चांनी संताप व्यक्त केला. फाशीच्या शिक्षेची मागणी केली  होती. न्यायालयाने तिन्ही आरोपींना  फाशीची शिक्षा दिल्याबद्दल मराठा समाज समाधानी आहे. 

 विकृत प्रवृतींवर वचक : कॉ. उमेश देशमुख 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उमेश देशमुख म्हणाले, कोपर्डीप्रकरणी तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा दिल्याने मुलीला न्याय मिळाला आहे. गुन्हगारी, विकृत प्रवृत्तींना वचक बसण्यास हा निकाल कारणीभूत ठरेल.  उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग दोषी अवलंबतील. त्यातून शिक्षेच्या अंमलबजावणीस विलंब होण्याची भीती आहे. फाशीच्या शिक्षेची तातडीने अंबलबजावणी होणे गरजेचे आहे.

 गुन्हेगारी प्रवृत्तींना कडक संदेश : महेश खराडे 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे म्हणाले, कोपर्डीप्रकरणी तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना कडक संदेश गेला आहे. आरोपींना फाशीच्या शिक्षेसाठी मराठा क्रांती मोर्चांच्या निमित्ताने समाज आग्रही राहिला. या मोर्चांना सर्वच समाजघटकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला. सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनीही बिनतोड युक्तीवाद केला. तिन्ही आरोपींना झालेली फाशीची शिक्षा हे या सवार्ंचे यश आहे. 

 फाशीच्या शिक्षेचे स्वागत : अशोक पाटील
अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश संघटक अशोक पाटील म्हणाले, कोपर्डीप्रकरणी तिन्ही आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेचे स्वागत आहे. न्यायदेवतेवरचा विश्‍वास वाढला आहे. शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी.