Fri, Apr 26, 2019 01:57होमपेज › Sangli › डीएसकेंसह दोन मुलांवर सांगलीत गुन्हा

डीएसकेंसह दोन मुलांवर सांगलीत गुन्हा

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 11:32PMसांगली : प्रतिनिधी

पुण्यातील डीएस ग्रुप अँड कंपनीत विविध योजनेत गुंतवलेले 9 लाख रुपये तसेच त्याचे व्याज मुदत पूर्ण होऊनही परत न दिल्याने डीएसके ग्रुपचे डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा सांगली शहर पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. 

दीपक सखाराम कुलकर्णी, हेमंत दीपक कुलकर्णी, शिरीष दीपक कुलकर्णी (सर्व रा. डीएसके हाऊस, जंगली महाराज रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी किरण अनंत कुलकर्णी (वय 65, रा. नागराज कॉलनी, विश्रामबाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. किरण कुलकर्णी यांनी कंपनीच्या विविध योजनांमध्ये 6 सप्टेंबर 2014 ते 13 ऑक्टोबर 2015 या काळात 8 लाख 95 हजार रूपये वेळोवेळी भरले होते. त्यांच्या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतरही कंपनीने त्यांची मुद्दल तसेच त्यावरील व्याज परत दिले नाही. याबाबत त्यांनी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी बुधवारी याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

विविध योजनांमध्ये लोकांकडून गुंतवणूक

तीनही संशयित भागीदार असलेल्या डीएस ग्रुप अँड कंपनीचे सांगलीत माधवनगर रस्त्यावर कार्यालय होते. तेथे कंपनीच्या विविध योजनांमध्ये लोकांकडून गुंतवणूक करून घेतली जात होती.