Wed, Aug 21, 2019 20:08होमपेज › Sangli › आयुक्त महापौरांचे भांडण कशासाठी?

आयुक्त महापौरांचे भांडण कशासाठी?

Published On: Dec 16 2017 1:48AM | Last Updated: Dec 15 2017 9:24PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

विकासाच्या नावे आयुक्त आणि महापौरांसह नगरसेवकांचे भांडण कशासाठी सुरू आहे, याचा सोक्षमोक्ष झाला पाहिजे. यासाठीच दोघांनीही जनता दरबारात येऊन त्याचा खुलासा करावा, असे आव्हान सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी बैठकीत दिले. येथील कष्टकर्‍यांची दौलतमध्ये एकूणच शहराच्या विकासासह पदाधिकारी, नगरसेवक, प्रशासनाच्या बेबनावाचा चांगलाच खल रंगला. 
पदाधिकारी, नगरसेवक हे विश्‍वस्त आहेत. तर जनतेकडून गोळा केलेल्या करातूनच आयुक्तांचा पगार होतो त्यामुळे हे दोघेही नोकर आहेत.

पण एकूण परिस्थिती  आणि सुरू असलेल्या वादासह शहराच्या खुंटलेल्या विकासाला जबाबदार कोण? कशात घोडे अडले, दोषी कोण याचाही त्यातून सोक्षमोक्ष लागेल, असा सूर सर्वांनी आळवला. यासंदर्भात शनिवारी महापौर व आयुक्तांना भेटून जनता दरबारासाठी वेळ मागणार असल्याचे सर्वांनी सांगितले. यातून कोण दोषी, कोण बरोबर हे ठरवून समितीची भूमिका ठरवू, असा निर्णय झाला.
यावेळी बापूसाहेब मगदूम, सतीश साखळकर म्हणाले, आयुक्त व महापौरांना आपल्या पद आणि जबाबदारीचे गांभीर्य नाही. यांना अधिकारी, लोकप्रतिनिधी म्हणून भांडणासाठी नव्हे तर शहराच्या विकासासाठी पाठविले आहे. यांचे भांडण कशासाठी चालले आहे? कोण बरोबर, कोण चूक हे जनताच  ठरवेल. 

अमर पडळकर म्हणाले, पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन  कोणाचाच स्वच्छ कारभार नाही. पालिकेतील 70 टक्के पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी निलंबित झाले आहेत. सध्याचे भांडणही टक्केवारीतून सुरू आहे. एकमेकांच्या साथीनेच भ्रष्टाचार आसिफ बावा म्हणाले, नगरसेवक व प्रशासनात नैतिकता शिल्लक आहे का? एकमेकांच्या साथीनेच भ्रष्टाचार सुरू आहे. यात काहीतरी कमी जास्त झाले असेल त्यामुळे आता त्यांच्यात भांडण लागले आहे.  नगरसेवकांना अधिकारीच भ्रष्टाचार करायला शिकवतात.  जनतेच्या दरबारात येऊन त्यांनी याचा सोक्षमोक्ष लावावा. पृथ्वीराज पवार म्हणाले, महापालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे, कृती समितीने अनेक प्रकरणे उघडकीस आणली तरीही त्यावर कारवाई होत नाही. भ्रष्टाचार प्रशासन करीत असले तरी नगरसेवक सभागृहात काय करतात? प्रशासनाला जाब का विचारत  नाहीत? 

कोणाच्या तरी पोटात दुखतेय...!

माजी नगरसेवक युनूस महात म्हणाले, महापालिकेतील भ्रष्टाचार आपण थांबवू शकत नाही. मुळात निवडणुकीत मतांचा आणि पैशांचा हिशेब घातला जातो. मग चांगले उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा कशी करायची? आता लोकांनीच ठरवलं पाहिजे. सध्या पालिकेत सुरू असलेला प्रशासन व लोक प्रतिनिधी यांच्यातील वाद कोणाच्या तरी एकाच्या पोटातं दुखतं असल्याने होत आहे. आयुब पटेल म्हणाले, प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात किती विकास कामे झाली याचे प्रगती पुस्तक जाहीर करावे. त्यातून त्यांच्या विकासाचा आरसा जनतेसमोर येईल. यावेळी किरण कांबळे, सुरेश दुधगावकर यांनी आपली मते व्यक्त केली. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृती करण्यासाठी प्रभाग निहाय सभा घेण्याचा निर्णय झाला. रविवार 24 रोजी प्रभाग एक मधील पंचशील नगर येथे सायंकाळी 5 वाजता सभा घेण्यात येणार आहे. बैठकीला वि. द. बर्वे, डॉ. संजय पाटील, विकास मगदूम, प्रशांत भोसले, उमर गवंडी, सर्जेराव पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.