Wed, Jun 26, 2019 23:49होमपेज › Sangli › ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागायतदार धास्तावले

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागायतदार धास्तावले

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 8:13PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

दक्षिण भारतातील समुद्रात ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने जिल्ह्याच्या बहुतेक भागात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागाने केला आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार हादरले आहेत. अवकाळी पाऊस झाल्यास द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे रब्बीसह विविध पिकांच्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

पंधरा - वीस दिवसांतून ढगाळ वातावरण तयार होते. काही ठिकाणी अवकाळी पाऊसही झाला. त्याचा फटका द्राक्ष आणि भाजीपाला पिकाला बसला. अनेक शेतकर्‍यांच्या बागेत दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. रोगाला थोपवण्यासाठी हजारो रुपये औषधावर खर्च करावे लागले. त्यातूनही अनेकांचे 25 ते 30 टक्के नुकसान झाले. चांगला दर मिळवण्यासाठी अनेक बागायतदार आगाप पीक छाटणी घेतात. त्यांना या बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे.

आगाप छाटणी घेतलेल्यांची द्राक्षबाग तयार होत आली आहे. मात्र दुसर्‍या बाजूला ढगाळ वातावरणामुळे हातातोंडाशी आलेला घास जाणार की काय? अशी धास्ती शेतकर्‍यांना वाटू लागली आहे. कारण दक्षिण भारतात आलेल्या ओखी वादळामुळे पुन्हा ढगाळ वातावरण तयार होत आहे. मंगळवारी आणि बुधवारी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. पाऊस झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्याशिवाय अनेक बागा फुलोर्‍यांत आहेत. त्यांना या वातावरणाचा फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अगोदरच औषध फवारणीचा धडाका लावला आहे. 
हरभरा, गहू या पिकावरही वातावरणामुळे कीड वाढण्याची शक्यता आहे. रब्बी ज्वारीला हा पाऊस मात्र उपयुक्त ठरणार आहे.