महिलेची आत्महत्या
महिलेची आत्महत्या
सांगली : प्रतिनिधी
शहरातील फौजदार गल्लीत राहणार्या महिलेने पुत्रवियोगाच्या नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. संगीता शशिकांत दाणेकरी (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संगीता पती आणि सासूसोबत फौजदार गल्लीत राहात होत्या. त्यांचे पती महापालिकेतील आरोग्य विभागात काम करतात. एक वर्षापूर्वी त्यांच्या मुलीचा विवाह झाला आहे.
तर दीड वर्षापूर्वी फिट्सच्या आजाराने त्यांच्या अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपासून त्या मुलाच्या आठवणीने वैचेन होत्या. मंगळवारी सायंकाळी त्यांनी माहेरी भावांना फोन करून मुलाची तीव्र आठवण येत असल्याचे सांगितले होते. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांचे पती नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. तर सासूही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या काळात त्यांनी विषारी औषध घेतले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साडेदहाच्या सुमारास त्यांनी पतीला फोनही केला होता. साडेअकराच्या सुमारास त्यांचे पती घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संगीता यांच्या गळ्याला स्कार्फ लावला होता.