Tue, Apr 23, 2019 02:26होमपेज › Sangli › सांगली बसस्थानकाचे रुप पालटणार

सांगली बसस्थानकाचे रुप पालटणार

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 11:19PMसांगली : प्रतिनिधी

बीओटी तत्वावर सांगलीचे बसस्थानक व माधवनगर येथे आगाराचे काम सुरू करण्यासाठी ठेकेदारच मिळत नसल्याने गेली अनेक वर्षे हे काम प्रलंबित  होते. आता ते काम सार्वजनिक आणि खासगी सहभागातून  करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे लवकरच सांगली बसस्थानकाचे रुप पालटून ते सुसज्ज होणार आहे. तसेच  माधवनगर येथे स्वतंत्रपणे सुसज्ज आगार व मिनी बसस्थानक उभारण्यात येणार आहे. 

वाढती प्रवासी संख्या आणि अपुरी जागा यामुळे सांगली बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत. सुसज्ज असे दुकानगाळे नाहीत. प्रवासी प्रतिक्षालय नाही. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावरच मिळेत तेथे बसची वाट पाहत उभे राहावे लागते. त्याचबरोबर चालक, वाहकांसाठी  व्यवस्था नाही. त्यामुळे या ठिकाणी बसपोर्टची उभारणी करावी, अशी मागणी गेल्या अनेक वषार्ंपासून करण्यात येत होती. परंतु त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. सध्या सांगली बसस्थानकातून 1200 ते 1300 बस धावतात. ताशी दीडशे गाड्यांची ये-जा असते. त्यामुळे बसस्थानकाची जागा अपुरी पडते  आहे. अनेकदा बस मागे घेताना प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे. 

बसपोर्टला ठेकेदारच मिळेनात

युतीचे शासन सत्तेवर आल्यानंतर राज्यातील 13 बसस्थानके सुसज्ज करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यानंतर एक कमिटी नेमून अन्य राज्यातील बसस्थानकांची पाहणी केली होती. परंतु सरकारजवळ  पैसा नसल्याचे सांगून ही कामे बीओटीच्या माध्यमातून करण्याचे ठरले. त्यानुसार सांगलीत सुसज्ज असे बसपोर्ट उभारण्याचे ठरले होते. तसेच माधवनगर येथील पावणेचार हेक्टर जागेत सुसज्ज अशा आगाराची निर्मिती व मिनीबसस्थानक उभारण्याचे ठरले होते.  परंतु ही दोन्ही कामे करण्यासाठी कोणत्याही ठेकेदाराने तयारी दर्शवली नव्हती. त्यामुळे शासनाने गेली तीन वर्षे सांगलीच्या बसस्थानकाचे काम पुढे ढकलले होते. 

पीपीपीतून कामे करण्याचा निर्णय

ही कामे करण्यास ठेकेदार तयार होत नसल्याने शासन पुन्हा एकदा राज्यातील 13 बसस्थानकांची कामे ही सार्वजनिक खासगी सहभागा(पीपीपी)तून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुणे येथील एका आर्किटेक्ट आणि विकासकाची नेमणूक करण्यात आली आहे. विकासकाने सांगलीला भेट देऊन जागेची पाहणी केली आहे. सांगली बसस्थानक व आगाराची  2.54 हेक्टर जागा आहे. माधवनगर येथे पावणे चार हेक्टर जागा आहे. दोन्ही कामे होत एकदम होत नसल्याने सांगली विभागाच्यावतीने प्रथम सुसज्ज असे बसस्थानक उभे करावे व नंतर माधवनगर येथे आगार व मिनी बसस्थानक उभारावे, असे सुचविले आहे. माधवनगर येथील आगाराचा स्वतंत्र प्रकल्प तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर कामे करण्यास सुरुवात होणार आहे. 

राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे

सांगलीत सुसज्ज बसपोर्ट व आगार होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. युती शासन सत्तेवर आल्यावर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी बसपोर्ट करण्याबाबत आग्रह धरलेला होता. त्यानुसार त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. परंतु कामे करण्यास ठेकेदारच न मिळाल्यामुळे प्रकल्प  थांबला होता. आता जिल्ह्यातील आमदारांनी एकत्रपणे पुढाकार घेऊन प्रयत्न केल्यास सांगलीला सुसज्ज असे बसस्थानक व माधवनगरला आगार व मिनीबसस्थानक उभे राहील, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.