Thu, Jul 18, 2019 00:20होमपेज › Sangli › निवडणुकीसाठी भाजपकडून सांगलीत गुंडगिरी

निवडणुकीसाठी भाजपकडून सांगलीत गुंडगिरी

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 23 2018 10:47PMसांगली : प्रतिनिधी

भाजपला महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार मिळेनात. त्यामुळे हतबल झालेल्या या पक्षाने  नगरसेवकांवर हल्ले सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील आणि माजी महापौर सुरेश पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. 

भाजपच्या आमदारांसोबत फिरणारे आणि त्या पक्षाचे इच्छुक उमेदवार सुयोग सुतार यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांना फोनवरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या घरासमोर सत्तूर घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी सीसी फुटेजसह सर्व पुरावे विश्रामबाग पोलिसात दिल्याचे त्यांनी सांगितले. 

बजाज म्हणाले, महापालिका निवडणुकीतील भाजपच्या इच्छुकांनी साम, दाम, दंड वापरत गुंडगिरी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी व सौ. अंजना कुंडले यांचे प्रभागात चांगलेच काम आहे.  सुयोग सुतार यांनी नुकतीच सूर्यवंशी यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.  नंतर त्यांनी दुचाकीवरून हत्यारबंद जाऊन थेट सूर्यवंशी यांच्या दारात धिंगाणा घातला. याबाबत आम्ही पुरावे दिले आहेत. त्यामुळे  सुतार यांची पूर्वपार्श्वभूमी तपासावी व त्यांचावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात येणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई केली नाही तर राष्ट्रवादीच्यावतीने तीव्र आंदोलन उभारू.

सुरेश पाटील म्हणाले, भाजपने राजकारणात किती निचांकी पातळी गाठली आहे, त्याचा दाखलाच समोर आला आहे. नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संवेदशनील प्रभागाकडे अधिक लक्ष द्यावे व अशा घटना टाळाव्यात. 

हतबल भाजपच्या गुंडांचा हल्ला

सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेच्या मागील दोन निवडणुकांत सुयोग सुतार व संदीप सुतार यांचा मी पराभव केला होता. आताही भाजपकडून सुयोग इच्छुक आहेत. गुंडगिरीची पार्श्‍वभूमी असलेल्यांना या सूज्ञ प्रभागात जनता थारा देत नाही. उलट माझ्यामागे पूर्ण पाठबळ आहे. त्यामुळेच हतबल झालेल्या सुयोग यांच्यासह पाचजणांनी माझ्या घरासमोर येऊन दहशत माजवत मला जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी देखील त्यांच्या समर्थकांनी माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. अशा हल्ले व धमक्यांना मी भीक घालणार नाही.