Sat, Aug 24, 2019 23:15होमपेज › Sangli › महसूल कर्मचार्‍यांचा कामकाज बहिष्कार कायम

महसूल कर्मचार्‍यांचा कामकाज बहिष्कार कायम

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 11:52PM

बुकमार्क करा

सांगलीः प्रतिनिधी

वाळव्याचे तहसीलदार नागेश पाटील यांनी तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यास मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील महसूलच्या कर्मचार्‍यांचे शुक्रवारी म्हणजे दुसर्‍या दिवशीही  कामबंद आंदोलन सुरू  होते. दरम्यान या आंदोलनास तलाठी आणि कोतवाल संघटनेने पाठिंबा दिला आहे.  सोमवारपासून काम बंद आंदोलनात सहभागी होण्यास त्यांनीही तयारी दर्शवली आहे. निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून बुधवारी  तहसीलदार पाटील यांनी लिपिक सुनील साळुंखे यांना अर्वाच्य शिवीगाळ करीत श्रीमुखात लगावली होती. त्याच्या निषेधार्थ कर्मचार्‍यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

जोपर्यंत तहसीलदार पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांची जिल्ह्याबाहेर बदली होत नाही तोपर्यंत कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा  संघटनेने दिला आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विलास कुरणे यांनी येथे आज कर्मचार्‍यांची भेट घेतली. त्यांच्यासह जिल्हाभरातील सुमारे चारशे कर्मचार्‍यांनी मागण्याबाबत निदर्शने केली. महसूल कर्मचार्‍यांनी   काम आंदोलन सुरू केल्यामुळे बहुसंख्य कार्यालयात  दिवसभर शुकशुकाट होता.  आंदोलनाचा कामकाजावर परिणाम झाला असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. पाच जिल्ह्यांचे कामकाज बंद ठेवण्याचा इशारा तहसीलदार पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली न झाल्यास पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील महसूल कर्मचारी कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत.  तसा इशारा संघटनेने दिला आहे. 

संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस चंद्रकांत  पार्लेकर, पुणे विभागीय सचिव कैलास कोळेकर या आंदोलनात सहभागी झाले आहेत.   पाटील यांच्यावर नागरी सेवा शिस्त व अपील 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करून फौजदारी दाखल करावी, अशी मागणी संघटनेकडून होत  आहे.