Sun, Oct 20, 2019 01:10होमपेज › Sangli › सांगलीत युवकावर खुनी हल्ला

सांगलीत युवकावर खुनी हल्ला

Published On: Dec 03 2017 1:25AM | Last Updated: Dec 03 2017 1:07AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

शहरातील विश्रामबाग येथील शंभर फुटी रस्ता परिसरात एका युवकावर खुनी हल्ला करण्यात आला.  यामध्ये रणजित व्यंकटेश इरळे (वय 22) गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात एका युवकाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.  विनायक संजय सरवदे (वय 27, रा. विश्रामबाग) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी रणजित इरळे याने फिर्याद दिली आहे. रणजित शुक्रवारी रात्री त्याच्या कारमधून शंभर फुटी रस्त्याने निघाला होता. त्यावेळी विनायक मोटारसायकलवरून त्याच्या कारला घासून गेला. त्यावेळी अचानक घडलेल्या प्रकाराने रणजितने कार थांबविली. थोड्या अंतरावर जाऊन विनायकही थांबला. त्यानंतर रणजितने विनायकला काय झाले, असे विचारले. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर चिडलेल्या विनायकने शेजारी असलेल्या अपार्टमेंटमधून मोटारसायकलचे हँडल आणले व रणजितच्या डोक्यात घातले. यामध्ये रणजित गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विनायक सरवदे याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक सरवदे याला अटक करण्यात आली आहे. त्याला दि. 6 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.