होमपेज › Sangli › सी.एं.च्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा

सी.एं.च्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 11:47PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

येथे कॉलेज कॉर्नर परिसरातील एका सी.एं.च्या बंगल्यावर सोमवारी पहाटे सशस्त्र दरोडा घालण्यात आला. यावेळी सी.एं.च्या ऑफिस बॉयला बांधून, त्याला मारहाण करीत गुप्तीचा व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दरोडेखोरांनी 14 लाख 75 हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली. यामध्ये नारायण चन्नाप्पा गुड्डी (वय 42) जखमी झाला आहे.
सी.ए.  सुहास विठ्ठल देशपांडे यांचे कार्यालय आणि बंगला कॉलेज कॉर्नर परिसरात आहे. देशपांडे नातेवाइकाच्या लग्नासाठी सहकुटुंब शनिवारीच पुण्याला गेले होते. घरी कोणीही नसल्याने त्यांनी ऑफिस बॉय नारायण गुड्डी याला बंगल्यात झोपण्यास सांगितले होते.

त्याप्रमाणे शनिवारी व रविवारी नारायण बंगल्यातच मुक्कामाला होता. रविवारी रात्री तो बंगल्यातील हॉलमध्ये झोपला होता.  सोमवारी पहाटे चारच्या सुमारास 25 ते 30 वयोगटातील चार युवक तोंडावर मास्क बांधून त्याच्यासमोर आले. त्यांनी प्रथम त्याचा गळा दाबून त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एकाने त्याच्या गळ्याला गुप्ती लावली, तर  दुसर्‍याने रिव्हॉल्व्हर त्याच्या डोक्याला लावले. आवाज केल्यास ठार मारण्याची धमकी देऊन त्याला बांधून ठेवले. 

त्यानंतर दोन दरोडेखोर त्याच्याजवळच थांबले तर अन्य दोघेजण आत बेडरूममध्ये गेले. सुमारे पाऊण तास  ते दोघेजण घरात शोधाशोध करीत होते. त्यानंतर चौघेही आलेल्या वाटेने पळून गेले. 
दरोडेखोर गेल्याची खात्री झाल्यानंतर नारायण यांनी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करण्यासाठी मोबाईल शोधला असता तोही दरोडेखोरांनी पळवून नेल्याचे दिसून आले. 
त्यानंतर नारायण गुड्डी बंगल्यातून बाहेर पडले. त्यांनी शेजारी फोन मागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तो न मिळाल्याने ते थेट सांगली शहर पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी याबाबत नियंत्रण कक्ष आणि विश्रामबाग पोलिसांना कळविले. त्यानंतर श्‍वान पथकासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान गुड्डी यांनी घटनेबाबत देशपांडे यांनाही कल्पना दिली. 

पोलिसांनी बंगल्यात प्रवेश केल्यानंतर बंगल्याच्या लोखंडी खिडकीच्या फ्रेमचे नट-बोल्ट काढून दरोडेखोरांनी आत प्रवेश केल्याचे सकृतदर्शनी दिसून आले. त्यानंतर बंगल्यातील तीन बेडरूममध्ये असलेली सुमारे आठ ते नऊ कपाटे फोडून साहित्य विस्कटले होते. पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळावरील हाताचे ठसे घेतले. श्‍वानाने बंगल्याच्या पिछाडीस असणार्‍या दडगे हायस्कूलजवळील बोळापर्यंत दरोडेखोरांचा माग काढला मात्र तेथेच ते घुटमळले. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.