होमपेज › Sangli › अनिकेत कोथळे खून प्रकरण: कामटेंचा फोन, अनेकांनी झटकले हात!

अनिकेत खून प्रकरण: कामटेंचा फोन, अनेकांनी झटकले हात!

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 23 2017 9:11AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

अनिकेत कोथळेचा खून केल्यानंतर बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेने त्याच दिवशी रात्री अनेक पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे मोबाईलच्या कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट झाले आहे. यावेळी अनेकांनी हात झटकल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.   अनिकेतच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास सीआयडीतर्फे सुरू आहे. आतापर्यंत याप्रकरणी अनेकांची चौकशी करून जबाब घेण्यात आले आहेत.

अनिकेतचा कोठडीत खून केल्यानंतर कामटेसह त्याचे साथीदार मृतदेह घेऊन सांगली शहरात फिरत होते. त्यावेळी  भांबावलेल्या कामटेने अनेकांना फोन केले होते. त्यामध्ये काही पोलिस अधिकार्‍यांचाही समावेश होता, असे कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट झाले आहे.  मात्र, कामटेने  जरी या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असला, तरी अनेकांनी हात झटकले. तर, अनेकांनी त्याच्याशी बोलणेही टाळल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील अनेकांना चौकशीसाठी पुन्हा बोलावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

तपास करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना

पुणे : प्रतिनिधी 

सांगली येथील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे मुख्यालयात शुक्रवारी आढावा बैठक झाली. यावेळी तपास अधिकार्‍यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद, पोलिस अधीक्षक श्रीकांत पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दि. 6 नोव्हेंबर रोजी सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला आणि झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत                   

गुन्हेगाराप्रमाणे त्यास मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी सर्व पोलिसांना अटक करून सेवेतून बडतर्फ केले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला. सीआयडीने तपास सुरू केल्यानंतर लगेचच वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कसून चौकशी करण्यात आली.

त्यानंतर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार उपनिरीक्षक कामटे याचीही कसून चौकशी केली. त्यानंतर सीआयडीकडून तपासासंदर्भात आढावा घेण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. याबाबतची बैठक शुक्रवारी सकाळी सीआयडीच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत  विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी तपासाचा आढावा घेऊन तपास अधिकार्‍यांना तपासासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.