होमपेज › Sangli › दोघांच्या पलायनाचा गुन्हा खोटाच

दोघांच्या पलायनाचा गुन्हा खोटाच

Published On: Feb 07 2018 1:36AM | Last Updated: Feb 06 2018 10:17PMसांगली ः प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सोमवारी सातशे पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणात अनिकेतचा खून केल्यानंतर  बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने अनिकेतसह अमोल भंडारेने पोलिस कोठडीतून पलायन केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा खोटा असल्याचे निष्पन्न झाले असून खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी कामटेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचाही तपास पूर्ण झाला असून याबाबत लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. 

दि. 5 नोव्हेंबररोजी पहाटे अनिकेत व अमोलने संतोष गायकवाड या अभियंत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले होते. याची माहिती मिळताच झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले आणि हवालदार नसीरूद्दीन मुल्ला यांनी अनिकेतला त्याचदिवशी पहाटे ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अमोललाही ताब्यात घेतले. दोघांनी गायकवाडला लुटल्याची कबुली दिल्यानंतर दि. 6 रोजी त्यांच्याविरोधात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्याच दिवशी रात्री गुन्ह्यांबाबत चौकशी करताना कामटेसह त्याच्या साथीदारांनी अनिकेतवर थर्डडिग्रीचा वापर केला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर अनिकेतचा मृतदेह घेऊन कामटे, हवालदार अनिल लाड, अरूण टोणे अमोलला घेऊन आंबोलीला गेले. तिकडे जाण्यापूर्वी या तिघांसह पट्टेवाले, मुल्ला, राहुल शिंगटे आणि कामटेचा मामेसासरा मृतदेहासोबत सांगलीत फिरत होते. पोलिस कोठडीतून दोन संशयित गायब झाल्याने वरिष्ठांकडून सातत्याने विचारणा होऊ लागल्याने कामटेने स्वतः स्टेशन डायरीत दोघेही पळून गेल्याची नोंद केली. त्यांना शोधण्याचे नाटकही केले. दि. 7 रोजी सकाळी अमोल भंडारे बेळगावात सापडला असून त्याला घेऊन येत असल्याचे कामटेने वरिष्ठांना कळविले. मात्र कामटे सांगलीत नसतानाही त्यादिवशी सकाळी अनिकेत आणि अमोलने कोठडीतून पलायन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणाचा तपासही सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. त्याचा तपास पूर्ण झाला असून कामटेने खोटी फिर्याद देऊन स्वतः खोटा गुन्हा नोंद केल्याचे स्पष्ट झाले आहे. सीआयडीने पोलिसांची डायरी ताब्यात घेतली असून कामटेच्या हस्ताक्षराचे नमुनेही घेतले आहेत. आता आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे सीआयडीच्या सूत्रांनी सांगितले.