Tue, Jul 23, 2019 02:05होमपेज › Sangli › आरक्षणे उठविण्यावरून गदारोळ; महासभा गुंडाळली

सांगली : आरक्षणे उठविण्यावरून गदारोळ; महासभा गुंडाळली

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 12:14AMसांगली : प्रतिनिधी

गुंठेवारीतील आरक्षणे उठवण्यावरून मंगळवारी महासभेत प्रचंड गदारोळ झाला. मागील सभेत उपसूचनेद्वारे ठराव घुसडून आरक्षणाचा बाजार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. मात्र, नागरिकांच्या घरावर पडलेली आरक्षणे उठवत असल्याचा दावा करीत काँग्रेसने समर्थन दिले. यातून दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली.

सभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्या गोंधळातच अनेक विषयांना महापौर हारुण शिकलगार यांनी एका झटक्यात मंजुरी जाहीर करून अर्ध्या तासात सभा गुंडाळली.

मागील महासभेत मंजूर विकास आराखड्यात गुंठेवारीसह अन्य भागातील नागरिकांच्या घरांवर ठेवण्यात आलेली आरक्षणे  उठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आज इतिवृत्तात शिक्‍कामोर्तब करायचे होते. 

मात्र शिकलगार यांनी परस्पर काही नगरसेवकांच्या लेखी उपसूचना घेऊन तब्बल 25 आरक्षणे उठविल्याचा  आरोप राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी केला होता. त्याचे पडसाद महासभेत उमटले. 

सभा सुरू होताच शिकलगार म्हणाले, मी कोणत्याही आरक्षणाचा बाजार केलेला नाही. नागरी वस्त्यांवर घरे असल्याने ती आरक्षणे हटविण्याच्या उपसूचना नगरसेवकांनीच दिल्या आहेत. त्यांच्या विनंतीवरून आरक्षणे उठवण्याचा निर्णय घेतला आहे. जर यात कोणाला गैर वाटत असेल तर हा ठराव रद्द करू. सोबतच उपसूचना देणार्‍या नगरसेवकांची नावे वाचण्याचा नगरसचिवांना आदेश दिला. मात्र त्याला नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. गुंठेवारीतील नागरिकांच्या घरावर रस्ता, उद्यान, शाळा, क्रीडांगण अशी आरक्षणे पडल्याचे त्यांंनी सांगितले. लोकवस्तीत ही आरक्षणे असल्याने  ती उठवावीत, ठराव रद्द करू नये असा काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांनी पवित्रा घेतला. 

यावर शेखर माने आक्रमक झाले. ते म्हणाले, 12 क्रमांकाच्या विषयावर उपसूचनेद्वारे एक विषय घुसडला आहे, तो रद्द करावा. त्यानुसार उपमहापौर विजय घाडगे, राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, मैनद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी यांनीहीघुसडलेला ठराव रद्द करण्याची जोरदार मागणी केली. यावरून सभेत गोंधळ सुरू झाला. काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी नगरसेवकांत चांगलीच जुंपली. 

गटनेते किशोर जामदार म्हणाले, ‘आपल्याकडे बहुमत आहे. मग महापौरसाहेब कशाला घाबराताय? ठराव मंजूर करा’. यावर शिकलगार यांनी मोहिते, बागवान व सूर्यवंशी यांचा विरोध नोंदवून घेऊन विषय मंजूर केला. 

मोहिते यांनी मात्र राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेण्याची मागणी केली. त्याला शिकलगार यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे सर्वच नगरसेवकांचा विरोध नोंदविण्यासाठी मोहिते, बागवान, सूर्यवंशी यांच्यासह काही नगरसेवक पीठासनासमोर धावले. त्यांना विरोध करण्यासाठी जामदार, आवटीही पीठासनासमोर आले. त्यांनी सभा गुंडाळण्याची मागणी केली.
 त्यानुसार शिकलगार यांनी सर्व गोंधळात सर्वच विषय मंजूर करून सभा संपल्याचे जाहीर केले.  यावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘महापौरांनी सभा गुंडाळून पळ काढला’ अशा घोषणा दिल्या. प्रभारी आयुक्‍त सुनील पवार यांच्यासह अधिकार्‍यांना मात्र आजच्या सभेत बोलण्याची संधीच मिळाली नाही.