होमपेज › Sangli › कृषी अवजारे योजनांमध्ये दुहेरी फटका

कृषी अवजारे योजनांमध्ये दुहेरी फटका

Published On: Dec 16 2017 1:47AM | Last Updated: Dec 15 2017 11:41PM

बुकमार्क करा

सांगली ः उध्दव पाटील

बारा ते अठरा टक्के ‘जीएसटी’ आणि अनुदान कपात यामुळे जिल्हा परिषद स्विय निधीतील कृषी अवजारे योजनांमध्ये लाभार्थी शेतकरी हिस्सा वाढला आहे. लाभार्थी शेतकर्‍यांना दुहेरी फटका बसणार आहे. ‘स्टेट कृषी’कडील अवजारे योजनांमध्ये ‘जीएसटी’चा सिंगल फटका बसणार आहे. कृषी अवजारांवरील जीएसटी कमी केल्यास तसेच अनुदानाची रक्कम पूर्ववत केल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. जिल्हा परिषद स्विय निधीतून शेतकर्‍यांना कृषी अवजारांसाठी अनुदान दिले जाते. सन 2017-18 साठी 40 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. तीन अश्‍वशक्ती व पाच अश्‍वशक्ती विद्युत पंप, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, चाफकटरसाठी अनुदान दिले जाणार आहे. 

कृषी अवजारांवर शून्य ते सहा टक्के ‘व्हॅट’ होता. मात्र आता पाच ते अठरा टक्के ‘जीएसटी’ लागू झाला आहे. सौर पंप, बॅटरी पंपना व्हॅट लागू नव्हता. आता त्यावर 5 टक्के जीएसटी लागू झाला आहे. चाफकटर, रोटाव्हेटर, डिझेल इंजिन यावर 6 टक्के व्हॅट होता, आता 12 टक्के जीएसटी लागू झाला आहे. तीन अश्‍वशक्ती, पाच अश्‍वशक्ती, साडेसात अश्‍वशक्ती तसेच दहा अश्‍वशक्ती विद्युत पंप, ताडपत्रीला 6 टक्के व्हॅट होता, आता 18 टक्के जीएसटी लागू झाला आहे. अवजाराच्या किंमतीवर 5 ते 12 टक्के कर वाढला आहे. जीएसटीचा बोजा शेतकर्‍याच्या माथी

कृषी अवजारांवरील योजनांमधील अनुदान आणि लाभार्थी शेतकरी हिस्सा पाहता अनुदानाची रक्कम ही अवजाराच्या किंमतीच्या पन्नास टक्के किंवा निश्‍चित केलेेली अनुदान रक्कम यातील जी कमी आहे ती रक्कम असते. ‘जीएसटी’मुळे कर वाढला. कराचा  हा बोजा लाभार्थी शेतकर्‍याच्या माथी बसणार आहे. काही योजनांमध्ये जीएसटीचा बोजा लाभार्थी व शासन यांच्यावर निम्मा-निम्मा बसणार आहे. मात्र बहूसंख्य योजनांमध्ये ‘जीएसटी’मुळे वाढीव कराचा बोजा हा लाभार्थी शेतकर्‍याच्याच माथी बसणार आहे. जिल्हा परिषद स्वीय निधीतील कृषी अवजारांच्या योजनांमध्ये यावर्षी अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे ‘जीएसटी’च्या बोजाबरोबरच अनुदान कपातीचा बोजाही शेतकर्‍याच्या माथी बसला आहे. स्वीय निधीतील योजनांमध्ये अनुदानाची रक्कम पूर्ववत केल्यास तसेच कृषी अवजारांना जीएसटी माफ केल्यास अथवा सरसकट सर्व अवजारांना 5 टक्के जीएसटी आकारल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. 

‘स्टेट कृषी’मार्फत कृषी अभियांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजना, तृणधान्य विकास कार्यक्रम, कडधान्य विकास कार्यक्रम, गळीत धान्य विकास कार्यक्रम, मका विकास कार्यक्रम आदी योजनांमधून विविध कृषी अवजारे खरेदीसाठी शासन अनुदान आहे. रोटाव्हेटर, चाफकटर आदी अवजारांसाठी 36 टक्के, 42 टक्क्यांपर्यंत अनुदान आहे. रोटाव्हेटरला 35 हजार रुपये, चाफकटरला 10 हजार रुपये शासन अनुदान आहे. अनुदानाची ही रक्कम फिक्स आहे. परिणामी  ‘जीएसटी’मुळे वाढलेली किंमत लाभार्थी शेतकर्‍याच्याच माथी बसणार आहे.