Mon, Apr 22, 2019 11:45होमपेज › Sangli › ‘संभाजी भिडेंचा मनुवादी चेहरा अखेर उघड’

‘संभाजी भिडेंचा मनुवादी चेहरा अखेर उघड’

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 07 2018 2:03AM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेने दलितांसह तब्बल 59 जातींना अ‍ॅट्रॉसिटीनुसार न्याय्य हक्काचा अधिकार दिला आहे. पण अ‍ॅट्रॉसिटी म्हणजे लोकशाहीचा खून म्हणत शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी लोकशाहीचाच खून केला आहे, असा आरोप माजी महापौर विवेक कांबळे यांनी पत्रकार बैठकीत केला. आता जाती-धर्मात तेढ निर्माण करीत बहुजनांच्या तरुणांची डोकी फिरवणार्‍या भिडे यांचा खरा मनुवादी चेहरा उघड झाला आहे, असे ते म्हणाले.

त्यांना जाती-जातीत भांडणे लावून चातुर्वर्णाचा पुरस्कार करीत मनुवादीचे राज्य आणायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, भिडे यांच्यासारख्या भीमा- कोरेगावच्या निमित्ताने जाती-धर्मात भांडणे लावणारी ही प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे. कांबळे म्हणाले, भीमा- कोरेगाव आणि त्यानंतर सांगलीतही घडलेल्या तोडफोडीच्या घटना निंदनीय आहेत. पण भीमा- कोरेगाव प्रकरणाच्या मुळाशी जावून तपास केला तर भिडे आणि मिलिंद एकबोटे हेच आहेत. त्यांच्यावर दंगली भडकविण्याचे आरोप झाले आहेत. तसे गुन्हेही दाखल झाले आहेत. असे असताना भिडे यांनी जनतेची दिशाभूल करीत अ‍ॅट्रॉसिटीसारख्या घटनात्मक अधिकारालाही नावे ठेवून या प्रकाराला वेगळे वळण देण्याचा उद्योग सुरू आहे. 

ते म्हणाले, एवढ्यावर भिडे यांची मजल थांबली नाही. माझी चौकशी करा, म्हणत म्हणत त्यांनी मराठा क्रांतिमोर्चा, लिंगायत महामोर्चावरही टीका केली. वास्तविक या दोन्ही समाजाने आपापल्या न्याय्य मागण्या लोकशाही मार्गाने संविधानिकरित्या सरकारसमोर मांडल्या. असे आतापर्यंत 70 वर्षांत पहिल्यांदाच देवाचे राज्य म्हणत सरकारचे मधूनच गुणगान सुरू केले. जणू आपण सरकारचे भाट आहोत, असे दाखवून त्यांच्यावरील कारवाईपासून वाचण्यासाठी बेताल वक्तव्ये सुरू केली आहेत. आता कारण नसताना क्रांतिमोर्चा, लिंगायत मोर्चावरही टीका करून हिंदू धर्मात फुटीची वक्तव्ये करीत दिशाभूल सुरू केली आहे. यामागे समाजात फूट पाडून दंगली घडविण्याचा यांचा हेतू आहे, हे उघड दिसून येते. यामुळे शासन आणि प्रशासनानेही अशा प्रवृत्तीला वेळीच रोखले पाहिजे.  स्वाभिमानी आघाडीचे गटनेते नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, बापू सोनावणे,कार्यकर्ते उपस्थित होते.