Fri, Nov 16, 2018 08:41होमपेज › Sangli › कोथळे खूनप्रकरणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

कोथळे खूनप्रकरणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 09 2017 1:46AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अखेर विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याच्या विधी व कायदा विभागाच्या कक्ष अधिकारी सौ. वैशाली बोरुडे यांच्या स्वाक्षरीने तसे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे कोथळे कुटुंबीयांसह जनतेतून होणार्‍या मागणीला शासनाने न्याय दिल्याची चर्चा आहे. 

या निर्णयाची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दूरध्वनीवरून कोथळे कुटुंबीयांना दिली. गेल्या महिन्यात कोथळे या तरुणाचा पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात थर्ड डिग्री देऊन खून केला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. मात्र, अनिकेतसह त्याचा अटकेतील साथीदार अमोल भंडारे हे पोलिस ठाण्यातून पळून गेल्याचा बनाव कामटेसह साथीदारांनी केला होता. त्या प्रकरणाचा जनरेट्यामुळे पर्दाफाश झाला. या प्रकरणामुळे राज्यातील पोलिस खात्यातील गुन्हेगारीचीच लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. 

अखेर याप्रकरणी सीआयडी चौकशी सुरू असून, कामटेसह पाचजणांना बडतर्फ करण्यात आले आहे. तत्कालीन अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची बदलीही करण्यात आली. 

मात्र, या प्रकरणात योग्य तपास होत नसल्याचा आरोप कोथळे याचा भाऊ आशिष व अमित यांच्यासह कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे ही चौकशी सीबीआयकडे द्यावी, विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. अ‍ॅड. निकम यांच्या नियुक्तीबाबत गृहनिर्माण राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगलीत येऊन हमीही दिली होती. परंतु, यासंदर्भात निर्णय न झाल्याबद्दल कोथळे कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.