Fri, Jul 19, 2019 20:34होमपेज › Sangli › सांगलीत अ‍ॅसिड हल्‍ला ; तरुण गंभीर जखमी

सांगलीत अ‍ॅसिड हल्‍ला ; तरुण गंभीर जखमी

Published On: May 27 2018 1:22AM | Last Updated: May 26 2018 11:39PMसांगली : प्रतिनिधी

भिलवडी (ता. पलूस) येथील घराशेजारच्या बोळाच्या जागेत साहित्य ठेवल्यावरून झालेल्या वादातून चुलत भावावरच अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. यामध्ये सागर मारुती वावरे (वय 33, रा. भिलवडी) हे जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास सांगलीतील वारणाली वसाहत रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी जखमीच्या चुलत भावावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल राजाराम वावरे (वय 27, रा. भिलवडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. 

सागर आणि अमोल दोघेही सख्खे चुलत भाऊ आहेत. भिलवडीत ते  शेजारी राहतात. त्यांच्या घराशेजारी असलेल्या बोळात साहित्य ठेवण्याच्या कारणावरून दीड  महिन्यापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सागरने अमोलविरोधात भिलवडी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्याचा राग अमोलच्या मनात होता. 

सागर सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये काम करतो. शनिवारी सकाळी रेल्वेने तो सांगलीत आला होता. चालत हॉस्पिटलकडे निघाला असताना त्याचा अमोलने मोटारसायकलवरून पाठलाग केला. वारणाली वसाहत रस्त्यावर अमोलने  प्लास्टिकच्या बाटलीतील अ‍ॅसिड सागरच्या दिशेने फेवले. त्यामुळे सागर भांबावून गेला. या अ‍ॅसिड हल्ल्यात त्याचे गुडघ्यापासून दोन्ही पाय, पाठ, डावा हात गंभीररित्या भाजला आहे. 

अमोल मोटारसायकलवरून पळून गेला. तातडीने सागरला भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या फिर्यादीनुसार अमोलविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.