Sun, May 26, 2019 08:34होमपेज › Sangli › ‘स्वीय’च्या कमी खर्चावरून अर्थ सभेत नाराजी

‘स्वीय’च्या कमी खर्चावरून अर्थ सभेत नाराजी

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 10:56PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद स्वीय निधीच्या कमी खर्चावरून अर्थ समिती सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दि. 31 मार्चपर्यंत शंभर टक्के निधी खर्च न झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असे सुनावण्यात आले. अर्थ सभेला अनेक अधिकार्‍यांनी दांडी मारली. त्यामुळे खर्चाचा आढावा घेता आला नाही. 

सभापती अरूण राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ समिती सभा झाली. महिला व बालकल्याण सभापती सुषमा नायकवडी, अर्थ समिती सदस्य डी. के. पाटील,  जितेंद्र पाटील, संभाजी कचरे, प्रमोद शेंडगे, अरूण बालटे, संजीव पाटील, मंगल जमदाडे, मंदाताई करांडे, शांता कनुंजे, मनीषा बागल, रेश्मा साळुंखे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर व अधिकारी उपस्थित होते. माजी सदस्य (कै.) मारूती राजमाने यांच्या निधनाबद्दल शोक ठराव घेण्यात आला. 

जिल्हा परिषद स्वीय निधीचे सन 2017-18 चे प्रथम सुधारित बजेट 69.80 कोटी रुपयांचे आहे. यापैकी वीस ते पंचवीस टक्के खर्च झाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.  स्वीय निधीच्या खर्चासंदर्भात पंधरा दिवसात विशेष अर्थ सभा घेण्यात येईल, असे सभापती राजमाने यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्यांना दैनिक भत्ता व प्रवासभत्ता अत्यल्प आहे. पंचायत समितींचे सभापती जिल्हा परिषदेत विषय समितीवर सदस्य असतात. त्यांना दैनिक भत्ता, प्रवास भत्ता दिला जात नाही. त्यांना जिल्हा परिषद सदस्यांप्रमाणे भत्ते मिळावेत, असा ठराव झाला. ‘पशुसंवर्धन’कडील योजना पारदर्शी पध्दतीने राबवाव्यात. एकाच तालुक्यात लाभ मिळत असेल तर ही बाब चुकीची असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.