Mon, Jul 22, 2019 02:39होमपेज › Sangli › झेडपी कर्मचारी, शिक्षकांचे पगार रखडले

झेडपी कर्मचारी, शिक्षकांचे पगार रखडले

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 9:12PMसांगली : प्रतिनिधी

एप्रिल महिन्यातील तीन आठवडे सरत आले तरी अद्याप जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षकांना मार्चचे वेतन मिळालेले नाही. शासनाकडून वेतन अनुदान विलंबाने आले. वेतन बिल करण्यातील चालढकलपणाही कर्मचारी, शिक्षकांना विलंबाने वेतन मिळण्यास कारणीभूत ठरत आहे. 

जिल्हा परिषदेचा ‘मार्च एन्ड’ संपला आहे. मार्चच्या पगाराची प्रतीक्षा मात्र अद्यापही संपलेली नाही. कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी तसेच पेन्शनसाठी सोमवारी सायंकाळी शासन अनुदान आले आहे. कर्मचार्‍यांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा होण्यास आणखी तीन-चार दिवस लागतील, असे संकेत मिळत आहेत. अधिकार्‍यांचे वेतन मात्र झाले आहे. शासनाकडून जसे अनुदान येईल तसे वेतन बिल काढल्याचे सांगण्यात आले. 

शिक्षकांच्या वेेतन अनुदानासही शासनाकडून विलंब झाला आहे. वेतन बिले अद्याप कोषागाराला जमा झालेली नाहीत. त्यामुळे शिक्षकांच्या पगाराची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास आणखी चार दिवस लागतील, असे सांगण्यात आले. प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे म्हणाले, शिक्षकांच्या वेतनाची बिले पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला  विलंबाने सादर होतात. त्यामुळे विलंबाने वेतन मिळण्याचे प्रकार दरमहा होत असतात.