Wed, Jan 23, 2019 00:16होमपेज › Sangli › रत्‍नागिरीतील अपघातात सांगलीचे दोघे ठार

रत्‍नागिरीतील अपघातात सांगलीचे दोघे ठार

Published On: Jul 31 2018 5:48PM | Last Updated: Jul 31 2018 5:37PMतासगाव : प्रतिनिधी

 रत्नागिरीतील हातखंबापासून दोन किलोमीटर अंतरावर निवळी गावानजीक दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी आहे. हा दुर्दैवी अपघात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास झाला.

अनिल विजय शिरोटे (वय ३५) आणि रोहित रावसाहेब शिरोटे (वय २८ रा दोघेही कवठेएकंद तासगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर निवास आनंद थोरात (वय २७ रा कवठेएकंद) हा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. अपघातात दीपक भुपाळ शिरोटे (वय २७ रा. कवठेएकंद) किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील अनिल शिरोटे, रोहित शिरोटे, निवास थोरात व दीपक शिरोटे दोन दुचाकीवरुन (क्र.एमएच ०८ एम २३७० व एम एच १० एए ८०१३) अंगारकी संकष्टीनिमित्त गणपती पुळेला जाण्यासाठी पहाटेच्या वेळी कवठेएकंद येथून निघाले होते.

सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की अनिल आणि रोहित शिरोटे जागीच ठार झाले तर निवास थोरात गंभीर जखमी झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलिस अपघात स्थळी दाखल झाले. अनिल व रोहित शिरोटे यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रत्नागिरीच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेतील निवास थोरातला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.