Fri, Jul 19, 2019 18:48होमपेज › Sangli › चोर्‍यांबाबत पोलिस, बाजार समिती गंभीर नाही

चोर्‍यांबाबत पोलिस, बाजार समिती गंभीर नाही

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 06 2018 12:33AM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

मार्केट यार्डमधील चोर्‍यांबाबत पोलिस आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती गंभीर नाही. दोन वर्षात पस्तीस ते चाळीस चोर्‍या झाल्या, पण एकाही चोरीचा छडा लागला नाही. चोरीचा छडा लागेपर्यंत बेमुदत व्यापार बंद ठेवण्याच्या निर्णयावर व्यापारी शुक्रवारीही ठाम राहिले. निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.  सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात शुक्रवारी व्यापारी, हमाल, बाजार समिती व पोलिस अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. माजी महापौर सुरेश पाटील, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, मुजीर जांभळीकर, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक तसेच हमाल पंचायतचे बाळासाहेब बंडगर, चेंबरचे माजी अध्यक्ष रणमिक दावडा, गोपाळ मर्दा, दीपक चौगुले, प्रशांत पाटील, मुजीर जांभळीकर, भगवान सारडा, समीर साखरे, आण्णासाहेब चौधरी, सचिन घेवारे, शितल पाटील तसेच व्यापारी, हमाल उपस्थित होते. 

कर्नाटकमधून येणार्‍या वाहनांकडून पोलिस ‘एन्ट्री’ घेतात. पोलिसांच्या हप्त्यामुळे ट्रकचालक वैतागले आहेत. त्यामुळे कर्नाटकहून येणारी शेतीमालाची आवक कमी झाल्याकडे सुरेश पाटील, अजित पाटील यांनी लक्ष वेधले. सांगली मार्केट यार्डात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी तीन दुकाने फोडली. एका दुकानातून संगणक, लॅपटॉप, टीव्ही, हार्डडिस्कची चोरी झाली. चोरीच्या या प्रकाराने व्यापार्‍यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चोरीचा छडा लागेपर्यंत व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय चेंबर ऑफ कॉमर्सने गुरूवारी घेतला होता. शुक्रवारी व्यापार बंद होता. शुक्रवारी ‘चेंबर’मध्ये संयुक्त बैठक झाली. चोरीचा छडा लवकरच लागेल; त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. बाजार समितीचे सचिव पी. एस. पाटील यांनीही व्यापार सुरू करण्याचे आवाहन केले. 

‘बाजार समिती सेसच्या माध्यमातून वार्षिक 17 कोटी रुपये वसुल करते, पण यार्डच्या सुरक्षिततेबाबत मोठी उदासिनता आहे. चोर्‍यांबाबत पोलिस आणि बाजार समिती गंभीर नाही. तीन वर्षे झाली तरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत’, .  असे आरोप व्यापार्‍यांनी केले. शेतकरी प्रतिनिधी असलेल्या संचालकांचे यार्डमधील घडामोडींकडे, शेतकरी हिताकडे लक्ष नाही, असा आरोप बाळासाहेब बंडगर यांनी केला.