Fri, Jul 19, 2019 05:03होमपेज › Sangli ›

जिल्ह्याचा पारा 39 वर; विजेचा खेळखंडोबा

जिल्ह्याचा पारा 39 वर; विजेचा खेळखंडोबा

Published On: Apr 05 2018 2:11AM | Last Updated: Apr 05 2018 1:32AMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील तापमान 39 अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यातच भारनियमन सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.  जनावरांचे हाल होत आहेत. पाणी पाजून पिके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ उडाली आहे.  गेल्या आठ दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढू लागली आहे. पारा 38 ते 39 पर्यंत पोहोचला आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर या प्रमुख तीन शहरात तापमान 39 पर्यंत गेले आहे. जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी या ग्रामीण भागात पार्‍याने चाळिशी पार केली आहे. 

प्रचंड उष्म्यामुळे उष्माघातासह अन्य विकार वाढू लागले आहेत.  दुपारच्या रणरणत्या उन्हात लोक बाहेर पडत नाहीत.  महिला व लहान मुलांचा त्रास वाढला आहे. त्यातच विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. मंगळवारी सांगली, मिरज शहरात दुरुस्तीच्या नावाखाली बराच वेळ वीजपुरवठा ठप्प होता. त्यामुळे बहुसंख्य कार्यालयांत जनरेटरचा वापर करावा लागला. ग्रामीण भागात तर ऐन दुपारी वीजपुरवठा बंद होत आहे.  महावितरणकडे चौकशी केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जात  आहेत. 

वाढत्या उष्णतेचा जनावरांना त्रास होत आहे. चारा व पाण्याची कमतरता आहे. कोंबड्यांची मर मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पक्ष्यांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी  शेडवर कडबा, पाचोळा टाकून त्यावर पाणी मारत आहेत. काहींनी पोल्ट्रीत पंखे, कुलर लावले आहेत. पश्‍चिम भागातील ऊस, केळी, भाजीपाला पिकांना पाणी पाजताना शेतकर्‍यांची धावपळ उडाली आहे. पूर्व भागातील  डाळिंब, द्राक्षबागा  व अन्य पिके कमी पाण्यामुळे कोमेजू लागली आहेत. 
 

 

 

tags ; Sangli,news,temperature,Sangli, district,39, degrees, Celsius,