Tue, Apr 23, 2019 19:42होमपेज › Sangli › या चिमण्यांनो परत फिरा रे!

या चिमण्यांनो परत फिरा रे!

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 9:30PMसांगली : विवेक दाभोळे

पर्यावरणाच्या र्‍हासाचा,  तापमान बदलाचा फटका  चिमण्यांना चांगलाच बसू लागला आहे. काल-परवापर्यंत अंगणात होणारा चिवचिवाट आता  दुर्मिळ झाला आहे.  जीवशास्त्रीय अन्नसाखळीत कमालीचे महत्व असलेल्या चिमण्यांची संख्या  झपाट्याने कमी होत आहे. आज साजरा होत असलेल्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने..! सहजपणे  आढळणार्‍या पण दुर्लक्षित ठरलेल्या चिमण्यांची संख्या आता दुर्दैवाने घटू लागली आहे. याबाबत जागृती व्हावी यासाठी सन 2010 पासून चिमणीदिन साजरा केला जातो.

भारतात आढळतात पाच प्रजाती

साधारणतः आपल्याकडे  आढळणार्‍या चिमण्यांना ‘हाऊस स्पॅरो’ म्हणून ओळखले जाते.  देशभरात पाच प्रजातींच्या चिमण्या  तर जगभरात 24 प्रजातींच्या चिमण्या आढळतात. शहरी भागात घरात धूळ येऊ नये म्हणून स्लायडिंगच्या खिडक्या, तर डास येऊ नये म्हणून जाळ्या बसविल्या जातात. त्यामुळे चिमण्यांना घरात प्रवेश नाहीच, तर बाहेर घरटे बनवण्यासाठी जागा राहत नाही. पूर्वी खणांच्या घराच्या कोपर्‍यांत चिमण्या घरटे करायच्या.   

चिमण्यांना वाढत्या  औद्येगिकीकरणाचा फटका  बसतो आहे. कारखान्यांमधील विषारी धूर, घातक रसायनयुक्त पाणी, कर्णकर्कश हॉर्न, भोंगेही   चिमण्यांना धोकादायक ठरतात.  चिमण्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रमुख कारण हे शिसेरहित पेट्रोलचा वापर  मानले जाते. यात मिथेल टेरिटरी ब्युटेल इथर याचा अँटी नॉकिंग एजंट म्हणून वापर होतो. यामुळे  लहान किडे मारले जातात. पण हे किडे चिमण्यांचे मुख्य अन्न आहे. हे अन्न न मिळाल्यामुळे लहान पिलांना हे किडे न मिळाल्यामुळे चिमण्यांमध्ये बालमृत्यू दर वाढला  आहे. यासाठी  शक्य आहे त्याने चिमण्यांच्या संवर्धनासाठी  योगदान देण्याची गरज आहे. अन्यथा बालपणी ऐकलेल्या गोष्टीप्रमाणे ‘एक होती चिऊताई...’ असेच दुर्दैवाने म्हणण्याची वेळ भविष्यात येईल. चिमणी दिनाचा हाच खरा सांगावा आहे, असे म्हणावे वाटते! 

चिमणीचे घर मेणाचे तर मेणाचे....

 चिमण्यांना ससाणा आणि कावळ्यासारख्या शत्रूंचा सामना करावा लागतो. तर झाडावर साप व इतर पक्षी चिमण्यांची अंडीही खाऊन टाकतात. 15-20 वर्षांपूर्वीपर्यंत धान्यांची मळणी खळ्यात व्हायची. यासाठी बैलांचा वापर होत असे. 15-15 दिवस हे खळे चालायचे. खळ्याच्या आजूबाजूला पडलेले धान्य टिपण्यासाठी चिमण्यांची गर्दी होत असे; परंतु आता खळेच मोडित निघाल्याने चिमण्यांची धान्यांची सोयच संपली. त्यांची उपासमार होते. विलक्षण नाजूक असलेल्या चिमण्यांचा उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी तडफडून मृत्यू होतो. त्यांना जीवनदान देण्यासाठी गॅलरी, झाडाझुडुपात शक्य आहे तेथे वाटी, ग्लासमध्ये पाणी ठेवायला हवे.

चिमण्यांची शाळा...

आपल्याकडे ‘हाऊस स्पॅरो’ आणि ‘यलो थ्रोटेड हाऊस स्पॅरो’ या प्रजातीच्या चिमण्या आढळतात. ग्रामीण भागात विशेषत:  झाडां - झाडांवर चिमण्यांची शाळा भरायची.  सन 1985 पर्यंत पिंपळाच्या प्रत्येक पानावर एक चिमणी हमखास दिसायची. प्रत्येक झाडावर हजारो चिमण्या असायच्या. आता ही संख्या शेकडोवर आली आहे.

  • निमित्त चिमणी दिनाचे 
  • पर्यावरणाचा र्‍हास चिमण्यांच्या मुळावर 
  • वृक्षतोडीमुळे घरट्यांसाठी नाही जागा