Sat, Aug 24, 2019 18:51होमपेज › Sangli › भाजप, आरएसएसच्या पाडावासाठी एक व्हा

भाजप, आरएसएसच्या पाडावासाठी एक व्हा

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:29AMसांगली : प्रतिनिधी

भांडवलदारांना संरक्षण आणि कष्टकर्‍यांचे शोषण करणार्‍या भाजप सरकार व आरएसएसचा पाडाव करण्यासाठी एक व्हा, असे आवाहन विविध वक्त्यांनी केले.  भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने  राज्य अधिवेशनानिमित्त येथील स्टेशन चौकात गुरुवारी जाहीर सभा झाली. अध्यक्षस्थानी शेकापचे नेते अ‍ॅड. कॉ. सुभाष पाटील होती.  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व माजी खासदार सीताराम येच्युरी म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा करीत पंतप्रधान मोदी  सत्तेवर आले. परंतु, सध्या ललित मोदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी हे देशातून कर्ज काढून फरार झाले आहेत. 11 लाख कोटी रुपयांची लूट त्यांनी केली आहे. व्यापम कांडाची चौकशी सरकारने केली नाही. भाजपचे अध्यक्ष  शहा यांचा मुलगा भ्रष्टाचारात सापडला. परंतु, त्याचीही चौकशी नाही. दुसरीकडे अर्थसंकल्पात आयकरावर 1 टक्के सेस लावला आहे. 

ते म्हणाले, सर्वाधिक  शेतकर्‍यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. शेतकर्‍यांना कर्जमाफी नाही. नोकर्‍या नाहीत. आहे त्या नोकर्‍या सरकार काढून घेत आहे. वरून पकोडे बनवायचा सल्ला  देत आहे. देशाला अशा लूट करणार्‍या नेत्याची नव्हे; तर चांगला विकास करणार्‍या नीतीची गरज आहे. येच्युरी म्हणाले, भाजप आणि आरएसएस यांनी सर्व क्षेत्रात धार्मिक धुव्रीकरण सुरू केले आहे.     
शिक्षण क्षेत्राचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे या सरकारला हटविल्याशिवाय पर्याय नाही. 

माजी आमदार नरसय्या आडम म्हणाले, भाजपच्या राज्यात अनिकेत कोथळे या तरुणाला पोलिस उलटे टांगून खून करतात. त्याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे. बांधकाम कामगारांना न्याय नाही. कामगारांना पेन्शन नाही. जनतेचा पैसा सरकार शेअरमार्केटमध्ये गुंतवत आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी डावे आणि लोकशाही आघाडी  एकत्र येतील. माजी खासदार निलोत्पल बसू म्हणाले, मोदी सरकारने नोटाबंदी व जीएसटी लागू करून जनतेला वेठीस धरले. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत. अर्थसंकल्पात आरोग्यावरील खर्चात कपात केली आहे. खासगी विमा कंपन्यांकडून लूट केली जात आहे. धर्म आणि जातीच्य नावावर फूट पाडण्याचे काम सुरू आहे. 

किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात मुस्लीम लीग, हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी कधीही भाग घेतला नव्हता.  महात्मा गांधीची हत्या हिंदू महासभेच्या नथुराम गोडसे याने केली. आता दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना गोळ्या घालून ठार मारले. कॉ. मरियम ढवळे म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात स्त्रियांवरील अत्याचार वाढले आहेत. बजेटमध्ये महिलांसाठी तरतूद केली नाही. पुन्हा एकदा मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न करीत आहेत.  महेंद्रसिंह,आमदार जी. पी. गावित, कॉ. सुधा सुधारमन यांनीही मार्गदर्शन केले. कॉ. उमेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कॉ. विठ्ठल मोरे यांनी स्वागत केले. कॉ. रेहाना शेख यांनी आभार मानले. कॉ. रमेश सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.