Thu, Apr 25, 2019 04:01होमपेज › Sangli › तासगावाचा ऐतिहासिक रथोत्‍सव  (video)

तासगावाचा ऐतिहासिक रथोत्‍सव (video)

Published On: Sep 14 2018 2:03PM | Last Updated: Sep 14 2018 2:11PMतासगाव  :  प्रमोद चव्‍हाण

संपूर्ण महाराष्‍ट्रात उजव्‍या सोंडेचा गणपती म्‍हणून तासगावचा गणपती प्रसिध्द आहे. हेमाडपंथी मंदिर आणि लोकोत्साही परंपरेने गेली २३९ वर्षे साजरा केला जाणारा येथील रथोत्सव गणेश भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे. थोड्‍यावेळापूर्वीच तासगावच्‍या या ऐतहासिक रथोत्‍सवास सुरुवात झाली आहे. 
पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटक व सिमाप्रांतातही हा रथोस्तव सुप्रसिद्ध आहे.  आज, १४ सप्टेंबर रोजी तासगावच्या या गणपतीचा २३९ वा पारंपारिक रथोत्सव साजरा होत आहे.   

Image may contain: one or more people, crowd, sky, cloud and outdoor

तासगावचे  तत्कालीन संस्थानिक व मराठा साम्राज्याचे तत्कालीन सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन हे गणेशभक्त होते. त्यांनी  इ. स. १७७१ ते १७७९ या नऊ वर्षाच्या काळात तासगाव येथे सुंदर असे गणेश मंदिर बांधले. सन १७७९ मधे फाल्गून शुद्ध चतूर्थी या शुभदिनी उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची प्रतिष्ठापना केली. त्या वेळेपासून तासगाव येथील श्री गणपती पंचायतन संस्थानचा गणपती केवळ दीड दिवसांचा असतो.

Image may contain: one or more people, crowd and outdoor

रथोत्सवास ऐतिहासिक परंपरा

गणपतीची विसर्जन मिरवणूक रथातून काढली जाते. चालू वर्षी २३९ वा रथोत्सव तासगावकर साजरा करत आहेत. तासगावची ही एक ऐतिहासिक परंपराच म्हणावी लागेल.

पुण्यश्‍लोक हरभट पटवर्धन गणपतीपुळ्याच्या गणपतीचे भक्त

संस्थानिक पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष पुण्यश्‍लोक हरभट (बाबा) पटवर्धन हे एक अवतारी पुरुष होते. ते गणपतीपुळ्याच्या गणपतीचे भक्त होते. अनेक वर्षे त्यांनी श्रीची उपासना केली होती. पुढे त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्यावेळी त्यांना झालेल्या दृष्टांतात  घराण्याच्या उत्कर्षासाठी कोकण प्रदेशाचा निरोप घेण्याचे ठरवले. प्रवासादरम्यान त्यांनी इचलकरंजी येथे मुक्काम केला. यावेळी तेथे त्यांची भेट पेशवेकालीन सरदार इचलकरंजीकर घोरपडे यांच्याशी झाली. त्यांनी हरभट बाबांच्या सहा मुलांची पुण्याला पेशवे दरबारी केली. या सहा मुलांपैकी रामचंद्रपंत हे शास्त्र तेजात निपूण होते. त्यांचे चिरंजीव परशुराम पटवर्धन यांनीच तासगावातील गणपतीचे मंदिर बांधले.

सर्वात विश्‍वासू मराठा सरदार’ 

श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन हे संस्कृत पठण, शास्त्र विद्या, पत्रलेखन व रणांगणातील मर्दमुकी यात निपूण होते. त्यांना वडीलांचा फारसा सहवास लाभला नाही. इ. स. १७७५ ते १७९९ या काळात परशुरामभाऊ पटवर्धन यांनी मराठा साम्राज्याच्यावतीने पेशव्यांचे प्रतिनिधी, सरदार व नंतर सेनापती या नात्याने त्यांनी १०० लढायीच्‍यांमध्‍ये विजयी कामगिरी बजावली. तत्कालीन ब्रिटिश सेनापती लॉर्ड वेलस्की यांनी भाऊंबद्दल ‘सर्वात विश्‍वासू मराठा सरदार’ असे उद्गार काढले आहेत.

 तासगाव संस्थानची मुहूर्तमेढ इ. स. १७६५ मध्ये 

या थोर सेनापतीस थोरले माधवराव पेशवे यांनी पानीपतच्या पराभवानंतर मराठी साम्राज्याचे पुनर्गठन करण्यासाठी मिरज प्रांत कसबे तासगावचे संस्थानिक म्हणून नेमणूक केली. तासगाव संस्थानची मुहूर्तमेढ इ. स. १७६५ मध्ये रोवली.पटवर्धन घराण्यात ‘श्री’ भक्तिचा वारसा आणि परंपरा होती. आजोबा हरभट बाबा यांच्याकडून परशुराम भाऊंना गणेशभक्तीचे बाळकडू मिळाले होते. त्यामुळे ते गणपतीपुळे येथील श्रींच्यादर्शनासाठी जात असत. एकदा गणेशाने त्यांच्या स्वप्नात दर्शन दिले. व तासगावातच श्रींची प्रतिष्ठापना करण्याचे सांगितले. 

उजव्या सोंडेचा गणपती मंदिराचे वैशिष्ट्‍ये 

या दृष्टांतानंतर इ. स. १७७१ ते १७७९ या नऊ वर्षाच्या काळात तासगाव येथे सुंदर असे गणपती मंदीर बांधले गेले. परशुरामभाऊंनी विविध प्रदेशातील मंदिरांची पाहणी करुण हे मंदिर बांधले. आराखडा तयार केला. कर्नाटकातून गवंडी, सुतार, शिल्पकार व राजस्थानातून चित्रकार आणले व मंदिराची उभारणी केली. या मंदिराची रचना भव्यदिव्य अशी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. समोर प्रवेशद्वार व देवस्थानची कचेरी आहे. पुढे पटांगण असून शेजारी सभागृह आहे. सात मजली ९६ फूट उंचीचे राज्यातील एकमेव गोपूर या मंदिराचे आहे. मंदिराचे दगडी प्रांगण आहे. मंदिराच्या केंद्रस्थानी सिद्धिविनायक असून विष्णू, महादेव, सूर्यदेव व उमादेवी अशा चार मूर्ती आहेत. उजव्या सोंडेचा गणपती हे तासगावच्या मंदिराचे वैशिष्ट्‍ये आहे.  

१९७९ मध्ये रथोत्सवास सुरुवात

श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी कर्नाटकात श्रीरंगपट्टण येथे पाहिलेल्या रथोत्सवाची कल्पना  तासगाव येथे सन १९७९ मध्ये प्रथमच सुरु केली. तेंव्हापासूनच तासगावची भरभराट सुरु झाली. रथ ओढल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात, अशी गणेशभक्तांची भावना असते. श्रींचा रथ गुरूवार पेठेतील काशी विश्‍वेश्‍वराच्या मंदिरापर्यंत ओढतात. मिती भाद्रपद शुद्ध पंचमीचे दिवशी दुपारी या रथोत्सवास सुरवात होते. रथ परत गणपतीच्या मंदिरापर्यंत ओढला जातो व रथोत्सव संपतो.

प्रत्येक वर्षी महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक मोठ्या श्रध्देने या रथोत्सवात सहभागी होतात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इ. स. १८८५ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र त्याआधी १०६ वर्षे आधीपासून तासगावमध् रथोत्सवाची परंपरा सुरु आहे. हा रथोत्सव म्हणजे तासगावच्या ऐतिहसिक, धार्मिक जिवनाचा केंद्रबिंदू आहे. पण तो सामाजिक ऐक्याचा केंद्रबिंदूही ठरला आहे.

Image may contain: one or more people, crowd and outdoor

आज नुकत्‍याच सुरु झालेल्‍या  या रथोत्‍सव पाहण्‍यासाठी लाखो लोकांनी  गर्दी केली आहे.