होमपेज › Sangli › अधिकार्‍यांची दांडी; स्थायी सभा रोखली

अधिकार्‍यांची दांडी; स्थायी सभा रोखली

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 11:55PMसांगली  : प्रतिनिधी

वारंवार सूचना देऊनही स्थायी समिती सभेला अधिकारी दांडी मारतात. गुरुवारी सथायी समिती सभेला बांधकाम विभागासह अनेक अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन सभाच रोखली. अभियंता सतीश सावंत यांच्यासह अनेक अधिकारी दुबार कामांसह विविध कामांबाबत निर्णय घेत नसल्याबद्दल सदस्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. अखेर अर्ध्या तासानंतर अधिकारी सभेत आल्यानंतरच कामकाज सुरू झाले.

सभापती सातपुते म्हणाले, शासन निधी आणि महापालिकेने मंजूर केलेल्या कामांतील अनेक कामे दुबार होती. ती बदलून दुसरी करण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात निविदा प्रक्रिया तत्काळ होणे गरजेचे होते. परंतु दोन महिने उलटूनही कामे झालेली नाहीत. याबद्दल सावंत यांना जाब विचारला. यावेळी सावंत यांनी त्यांच्याकडे दुसरे काम असल्याचे सांगितले. यावरुन सदस्य आक्रमक झाले. 
आम्ही सांगतो ती कामे महत्त्वाची नाहीत का? जाणीवपूर्वक ती कामे रोखण्यामागे कोणाची सुपारी आहे? अखेर चर्चेतून उद्या (शुक्रवारी) यासंदर्भात पुन्हा 3 वाजता अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन कामांबाबत निर्णय घेण्याचे ठरले आहे.

दिलीप पाटील म्हणाले, मुख्य अग्निशमन अधिकारी भरतीबाबत प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वास्तविक महापालिकेतील सर्जेराव देसाई, विजय पवार, सुनील माळी या तिघांनी सहाय्यक अग्निशमन अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतले आहे. ते पदोन्नतीसाठी पात्रही आहेत. असे असताना जाहिरात करून ते पद भरण्याचे कारण काय? प्रतिनियुक्तीच्या अधिकार्‍यांनी स्थानिकांवर अन्याय करायचा उद्योग सुरू ठेवला आहे.

यावेळी अधिकार्‍यांनी पदोन्नतीतून हे पद भरता येणार नाही, असे सांगताच सर्व सदस्य संतापले. एका सफाई कर्मचार्‍याला मिरजेच्या सहाय्यक अधिकार्‍याचे पद दिले तर चालते मात्र  मूळ अग्निशमन विभागातील पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यास अडचण काय, असा सवाल विचारण्यात आला. पाटील म्हणाले, प्रभारी अधिकारी शिवाजीराव दुधाळ तीन महिन्यांत निवृत्त होणार आहेत. तोपर्यंत पदोन्नतीचा निर्णय होणे गरजेचे आहे. आम्ही बाहेरून पद भरू देणार नाही.